एनमुक्टोने मांडल्या विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:25 IST2020-12-03T21:25:31+5:302020-12-03T21:25:40+5:30
कुलगुरूंची भेट : रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित पूर्ण करा

एनमुक्टोने मांडल्या विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्या
जळगाव : ऑनलाईन अध्ययन-अध्यापन, परिक्षा अर्ज भरणे व ऑनलाईन परिक्षासंदर्भात विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना येणा-या अडचणींबाबत एनमुक्टा संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरूवारी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील यांची भेट घेतली.अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्याची मागणी शिष्टमडळाकडून करण्यात आली.
एनमुक्टनेचे नवनिवार्चीत अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. यावेळी कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, कुलसचिव डॉ. बी.व्ही. पवार, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक भेटीमध्ये त्यांनी आश्वासन देत काही निर्णय घेतले. त्यामध्ये परिक्षा अर्ज भरण्याची तारिख वाढवून ६ डिसेंबर करण्यात आली. तसेच ९ डिसेंबरपर्यंत विलंब फी सह अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याचे निश्चित झाले. २०२०-२१ या शैक्षणीक वर्षात द्वितीय व तृतीय वर्गांमध्ये प्रवेक्षित नियमीत विद्यार्थ्यांची तृतीय व पाचव्या सत्राची परिक्षा ही जानेवारी २०२१ मध्ये घेण्याचे ठरले. परिक्षा अर्जातील होणा-या चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही असेही आश्वासन देण्यात आले़ त्याचबरोबर कोविड काळात ज्या प्राध्यापकांनी विद्यापीठाचे आदेश पाळून वेळेत सर्व सोपविलेल्या जवाबदाऱ्या पुर्ण केलेल्या आहेत अशा प्राध्यापकांना कोरोना योध्दाच्या धर्तीवर विशेष प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्याचे ठरले. तसेच विद्यापिठीय व महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रखडलेल्या पदोन्नतींसाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासीत केले. प्राध्यापकांना पदोन्नतीवेळी मागीतल्या जाणा-या जाचक अशा समकक्षता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव अकॅडमीक काउन्सिलच्या बैठकी त मांडण्याचे आश्वासित करण्यात आले. धरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे भ्रष्ट कारभाराबाबत कार्यवाही त्वरित केली जाईल असेही कुलगुरु डॉ.पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळामध्ये उपाध्यक्ष डॉ. ई.जी.नेहते, सचिव डॉ. जितेंद्र तलवारे, सहसचिव डॉ.प्रकाश लोहार, खजीनदार डॉ. किशोर कोल्हे, जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन बावीस्कर व डॉ.प्रविण बोरसे यांचा समावेश होता.