वॉटर मीटरसाठी खासगी कंपनीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:50+5:302021-02-05T06:01:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाली असून यंत्रणा दुरुस्ती, पाणी खरेदी, शुद्धीकरण आणि ...

Private company proposal for water meter | वॉटर मीटरसाठी खासगी कंपनीचा प्रस्ताव

वॉटर मीटरसाठी खासगी कंपनीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाली असून यंत्रणा दुरुस्ती, पाणी खरेदी, शुद्धीकरण आणि विद्युत बिलापोटी साधारणता प्रति हजार लीटर पाण्यासाठी १६ रुपये खर्च येतो. मात्र, एका कंपनीने ही यंत्रणा नवीन बसवून ११ रुपये दराने पाणी देण्यासाठीचा प्रस्ताव मनपाकडे ठेवला आहे. याबाबत शुक्रवारी मनपात कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत महापौर भारती सोनवणे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच अमृत अंतर्गत पाणी करण्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असलेले वॉटर मीटरदेखील बसविण्याची तयारी कंपनीने दाखविली असून, याबाबतचा निर्णयासाठी मनपात शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे.

शुक्रवारी महापौरांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली. एआयबीसीसी कंपनीचे संस्थापक राजदील जमादार, जलतज्ञ मनोज यादव, प्रमोद भरबुडे यांनी माहिती दिली. शहरात स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ऑगस्ट महिन्यात एआयबीसीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक प्रस्ताव मनपाला दिला होता. युरोप, उत्तर मध्य भागासह जगभरातील तंत्रज्ञानाचा ३ वर्ष अभ्यास केल्यानंतर एआयबीसीसीने काही कंपन्यांशी करार केला असून भारतातील नागरिकांच्या आरोग्य सुधारणेसाठी ते त्यांचे तंत्रज्ञान देण्यासाठी त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.

आधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा होणार कार्यान्वित

मनपाला दिलेल्या प्रस्तावानुसार ते स्वखर्चाने जळगाव शहर मनपाच्या जलशुद्धीकरण यंत्रणेचे नूतनीकरण करणार आहे. जळगावकरांना पाणी देण्यासाठी सध्या प्रती हजार लीटरसाठी १६ रुपये खर्च होत असून गेल्या तीन वर्षातील संचित तोटा २८ कोटी आहे. एआयबीसीसीच्या प्रस्तावानुसार ते संपूर्ण अत्याधुनिक यंत्रणा बसवून देणार असून मनपाला १००० लीटर पाणी ११ रुपये दराने मिळणार आहे. शहराला एका वेळी १०० एमएलडी पाणी लागते. त्यानुसार एका वेळेस मनपाचे ५ लाख रुपये वाचणार आहे. महापौर भारती सोनवणे यांनी माहिती घेतली असता एआयबीसीसी कंपनी देत असलेल्या ११ रुपयांच्या खर्चात लाईटबिल, पाणी खरेदीचा खर्च देखील समाविष्ट करणार आहे.

वॉटर मीटर बसविणार?

नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यास साधारणत: २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच वॉटर मीटरचा अतिरिक्त खर्च लागणार आहे. एआयबीसीसी यंत्रणा हाताळणीसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार असून सुरुवातीला ३ वर्ष हाताळणार आहे. त्यानंतर ते यंत्रणा मनपा कर्मचाऱ्यांना हस्तांतरित करणार असून ते कायम तांत्रिक सल्ला देणार आहे. मीटर बसविल्याने नागरिक जेवढे पाणी वापरणार तेवढेच बिल येणार आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पुन्हा शनिवारी बैठक होणार असून, अंतिम चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: Private company proposal for water meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.