पहूर, ता जामनेर, जि.जळगाव : सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर पहूर पोलिसांच्या वतीने बंदोबस्तासाठी राहुटी लावण्यात आली खरी, पण येथे पोलीस दादांना बसण्याकरीता वेळ नसल्याने याचा ताबा डुकरांनी घेतला असून, निवांतपणे झोप घेताना दिसून येत आहेत. ही स्थिती तात्पुरती नसून, कायमस्वरूपी नागरिकांना दिसत आहे. ही राहुटी शोभेची ठरत असून, नागरिक याकडे कुतुहलाने पाहत आहेत.औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील पहूर हे ३० हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणीही आहे. त्यामुळे पर्यटकांसह प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. छोटे-मोठे अपघात नित्याचेच ठरले आहेत. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतुकीची कोंडी याचा फटका सर्वसामान्य माणसापासून ते येणाऱ्या पर्यटकांना बसतोे. यासाठी पहूर पोलीस ठाण्यातर्फे बसस्थानकासमोर पोलीस बंदोबस्तासाठी राहुटी उभारण्यात आली आहे.तसेच पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, बकरी ईद, कृष्ण जन्मोत्सव यादरम्यान कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी बंदोबस्त केला जातो. पण नेहमीसाठी याठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने राहुटी नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळेच पोलीस प्रशासनाचा उद्देश यशस्वी होणे प्रश्नचिन्हच आहे. मात्र रात्री गुरांच्या चोरट्या वाहतुकीची चाहुल या संबंधित पोलिसांना असून, त्या वाहनधारकांकडून ‘एरंडोली’ करण्यासाठी संबंधित कर्मचारी रात्री उशिरापर्यंत जातीने हजर राहत असल्याचे सांगण्यात आले आहे.एकंदरीत्, पोलीस या राहुटीचा वापर करत नसल्यानेच या डुकरांनी निवारा म्हणून ताबा घेतला, तर डुकरांचे चुकले तरी काय, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.‘लोकमत’च्या भीतीने राहुटी गायब‘लोकमत’ने याबाबत शनिवारी सविस्तर माहिती घेऊन राहुटीत झोपलेल्या डुकरांचे छायाचित्र घेतले. याची माहिती संबंधित पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या जागेवरील राहुटी काढून घेतली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी सांशकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात माहिती विचारण्यासाठी प्रभारी सपोनी हनुमान गायकवाड यांना संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
पहूर पोलिसांच्या राहुटीचा ताबा डुकरांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:31 IST