नेरी जवळ भरधाव कारच्या धडकेत चिंचोली येथील गर्भवती महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:34 IST2018-02-28T22:34:19+5:302018-02-28T22:34:19+5:30
अपघातात पोटातील बाळाचाही मृत्यू, पतीसह अन्य एक जखमी

नेरी जवळ भरधाव कारच्या धडकेत चिंचोली येथील गर्भवती महिला ठार
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२८ : नेरी येथून बाजार करुन दुचाकीने घरी येत असलेल्या दाम्पत्याला समोरुन येणाºया भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने सुरेखा विश्राम बारेला (वय २६, रा.चिंचोली, ता.जळगाव) ही गर्भवती महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी नेरी गावाजवळ घडली. या अपघातात महिलेच्या पोटातील आठ महिन्याच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले विश्राम गंगाराम बारेला हे पत्नी सुरेखा, मुलगी मनिषा व रुख्मा यांच्यासह चिंचोली येथे चार वर्षापासून वास्तव्याला आहेत. गावात शेतमजुरी करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. मंगळवारी नेरी येथील आठवडे बाजार असल्याने विश्राम बारेला, पत्नी सुरेखा व नातेवाईक शिवा अपसिंग बारेला हे दुचाकीने नेरी येथे गेले होते. बाजार आटोपल्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता ते चिंचोली येथे यायला निघाले असता गावापासून काही अंतरावर जळगावकडून येणाºया भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात पत्नी सुरेखा या जागीच ठार झाली तर विश्राम बारेला व शिवा बारेला हे गंभीर जखमी झाले.