चाळीसगावला 'पीआरसी'च्या दौऱ्याची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:49+5:302021-09-19T04:16:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : जिल्ह्यात २७ ते २९ असा पंचायत राज समितीचा तीन दिवसीय दौरा असल्याने येथे ...

The PRC's tour to Chalisgaon is in full swing | चाळीसगावला 'पीआरसी'च्या दौऱ्याची धामधूम

चाळीसगावला 'पीआरसी'च्या दौऱ्याची धामधूम

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : जिल्ह्यात २७ ते २९ असा पंचायत राज समितीचा तीन दिवसीय दौरा असल्याने येथे मोठी धामधूम सुरू आहे. रेकाॕर्ड अपडेट करण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकच लगीनघाई उडाली असून, सुट्टीच्या दिवशीही पंचायत समितीत कामाची लगबग सुरू असल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांना अर्लट केले गेले असून, रजाही रद्द करण्यात आल्या आहे.

पंचायत राज समितीचा २७ ते २९ असा जिल्हा दौरा जाहीर झाला आहे. विविध कार्यालयांसह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांचा राबता वाढला आहे. पंचायत राज समिती या दौऱ्यात काय आढावा घेणार? याबाबत तर्कविर्तक चर्चिले जात आहे. तपासणीबाबतची प्रश्नावली तयार असली तरी, समितीच्या 'फेऱ्यात' न येण्यासाठी डोळ्यात तेल घालून रेकाॕर्ड अद्ययावत केले जात आहे.

.........

चौकट

कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश

समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांसह जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक, आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले गेले आहे.

- कर्मचाऱ्याच्या रजादेखील रद्द करण्यात आल्या. सार्वजनिक सुट्टी असतानाही कर्मचारी कामात व्यस्त आहे.

- सद्यस्थितीत गत आठवड्यापासून जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांविनाही शाळा गजबजून गेल्या आहेत. शाळा पूर्णवेळ सकाळ व दुपार सत्रात भरविण्यात येत आहे.

..............

चौकट

चार वर्षांचे रेकाॕर्ड रडारवर

प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासह (खिचडी) गणवेश रेकाॕर्डची तपासणी होणार असल्याने चार वर्षांची जंत्री तयार करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक मंडळी सद्यस्थितीत एकवटली आहे.

1... काही वर्षांपूर्वी चाळीसगाव पंचायत समितीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय गणवेषाचा घोटाळा चांगलाच गाजला होता. त्यामुळे हेही रेकाॕर्ड व्यवस्थित करण्यासाठी शिक्षकांनी कंबर कसली आहे.

.........

चौकट

इथे असेल समितीची धडक

ग्रामीण भागातील अंगणवाड्या जि. प. शाळा, प्राथ. आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पं. स. चा कृषी विभाग, समाजकल्याण, ग्रामपंचायत आदी विभागात समिती धडक देऊ शकते. त्यामुळे यासर्वच विभागातील कर्मचारी अर्लट झाले आहे.

- दौऱ्याची तारीख खात्रीशीर जाहीर झाल्याने 'कात्री' लागू नये. यासाठी रेकाॕर्ड बिनचूक करण्यासाठी कर्मचारी सरसावले आहेत.

.........

चौकट

असा असेल समितीचा दौरा

२७ रोजी पंचायत राज समितीचे आगमन होईल. जिल्ह्यातील सर्व आमदारांशी समितीचे सदस्य औपचारिक चर्चा करतील. याच दिवशी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा होईल. जि. प. सभागृहात आढावा घेतला जाईल. २८ रोजी समिती जिल्हाभर कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाड्या यांचा आढावा व तपासणी. २९ रोजी जि. प. सभागृहात आढावा.

.....

इन्फो

पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहे. सुट्ट्या रद्द आल्या आहे. पं. स. व जि. प. अतर्गंत येणाऱ्या सर्व विभागांची तपासणी समिती करणार आहे. सुट्टीच्या दिवशीही काम केले जात आहे.

- नंदकुमार वाळेकर

गटविकास अधिकारी, पं. स., चाळीसगाव

Web Title: The PRC's tour to Chalisgaon is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.