कांदा लागवडीला वीज वितरणचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:56+5:302021-08-01T04:15:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. ...

Power distribution to onion cultivation | कांदा लागवडीला वीज वितरणचा खोडा

कांदा लागवडीला वीज वितरणचा खोडा

लोकमत न्यूज नेटवर्क

बिडगाव ता. चोपडा : परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांदा लागवडीला वीज वितरणच्या भारनियमनाचा खोडा ठरत आहे. आठवड्यातून फक्त तीनच दिवस दिवसा वीज मिळत आहे.म्हणून कांदा लागवड करावी तरी अशी?असे संकट परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठाकले आहे.

बिडगाव येथील सरपंच विजया देविदास पाटील यांनी परिसरात होणाऱ्या भारनियमनाच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांची कांदा लागवडीची समस्या सोडवावी, अशी मागणी लेखी स्वरूपात वीज वितरणकडे केली आहे.

बिडगावसह परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी महागडी हजारो रुपयांची कांद्याची बियाणे विकत घेऊन मोठ्या प्रमाणात कांदा रोपांच्या नर्सरी टाकून लागवडीचे नियोजन केले आहे. अनेक शेतकऱ्यांची रोपेही आता तयार झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवडही सुरू केली आहे. ही लागवड आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

कांद्याची लागवड ही वाहत्या पाण्यात केली जाते व पाण्यासाठी विजेची आवश्यकता असते. मात्र, वीजवितरणचे भारनियम या कांदा लागवडीला अडथळा ठरत असून, लागवडी रेंगाळत आहेत. बिडगांव व कुंड्यापाणी या शेतशिवारात वीजपुरवठा करणाऱ्या फिडरला गेल्या चार वर्षांपासून आठवड्यातून फक्त शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीनच दिवस सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिवसा वीज पुरवठा केला जातो व चार दिवस रात्री वीज मिळते, ती दिवस उगविण्याआधीच बंद होत असते. त्यामुळे तीन दिवसांत लागवड करणे शक्य होत नाही. नर्सरीवर हजारो रुपये खर्च करून रोपे तयार करूनही विजेअभावी लागवड बंद पडते व पुन्हा लागवडसाठी दिवसाच्या वीजपुरवठ्याची चार दिवस प्रतिक्षा करावी लागते. तशात पाऊस आला तर रोपेही खराब होतात व मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी शेतकरी डबघाईस जातात आणि तीनच दिवस दिवसा विजेमुळे मजुरांचीही धांदल उडते व चार दिवस घरीच बसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांचेही नुकसान होते. आधी रात्र व दिवस असे रोटेशन‌नुसार हे भारनियम बदलत होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून वीजवितरणकडून त्याच्यात बदलच केला नाही. मागील वर्षी लागवड कमी होती व रात्री येणारी वीज सकाळी नऊ वाजेपर्यंत मिळत होती. त्यामुळे अडचण भासली नव्हती. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड आहे व रात्री मिळणारी वीज सकाळी पाच वाजताच बंद होते.

भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी

विजेअभावी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीआधीच वीज वितरणच्या सुलतानी संकटात सापडले आहेत. तरी महावितरणने याची वेळीच दखल घेऊन भारनियमच्या वेळेत बदल करून आठवड्यातून दिवसा तिन दिवसच होणारा वीजपुरवठा चार दिवस करावा व रात्री मिळणारा वीजपुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत करावा अशी मागणी बिडगांव येथील महिला सरपंच विजया पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोपडा तालुक्यात कांद्याची लागवड सुरू असताना. (छाया : रावसाहेब पाटील,बिडगाव)

Web Title: Power distribution to onion cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.