महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:28 IST2018-12-10T01:26:36+5:302018-12-10T01:28:18+5:30
व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.

महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
भुसावळ, जि.जळगाव : व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तिलक छोटू मट्टू (रा. द्वारका नगर) याने मध्य प्रदेशमधील रायपूर येथे आरबीआयच्या परीक्षेसाठी गेलेल्या आदर्श सोनवणे मित्रास फोन केला. यावेळी त्यांच्यात फोनवर चांगलाच वाद झाला. त्यात तिलक मट्टू याने महापुरुषाचे नाव घेऊन शिवीगाळ केली, ती आॅडीओ क्लिप सोनवणे यांनी मित्रांच्या व्हॉट्अप ग्रुपवर टाकली. ती क्लीप वायरल झाली. यामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. यानंंतर जमावाने संशयित आरोपीच्या घरात तोडफोड केली व संशयितावर गुन्हा दाखल करुन कारवाईच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाणे गाठत महिला पुरुषांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी पोलिसांतर्फे जमावाला शांततेचे आवाहन करण्यात आले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, तालुका पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलीस अधिकारी शहर पो.स्टे.ला दाखल होऊन शहरात पोलीस कर्मचारी तैनात केले. यावेळी जमावाने पोलिसांना लेखी निवेदन देऊन अपशब्द वापरणारी पोस्ट टाकल्याबद्दल संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी रात्री उशिरा सामूहिक फिर्यादीवरुन संशयित आरोपी तिलक मट्टू याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.