निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच ग.स.सोसायटीत राजकीय भूकंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:33+5:302021-02-05T05:52:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच सोसायटीत ...

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच ग.स.सोसायटीत राजकीय भूकंप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच सोसायटीत मोठा राजकीय भुकंप झाला असून, सत्ताधारी लोकसहकार गटातील ४ संचालकांसह विरोधी असलेल्या सहकार गटातील १० अशा एकूण १४ संचालकांनी गुरुवारी आपले राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले आहे. विशेष म्हणजे सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी देखील राजीनामा दिला असून, राजीनामा दिलेल्या सर्वच संचालकांनी अध्यक्ष मनोज पाटील यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग.स.सोसायटीत एकूण १९ संचालक असून, सर्व संचालक हे सहकार गटाचेच होते. मात्र, मे २०१९ मध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहकार गटात उभी फुट पडून लोकसहकार गटाची स्थापना होवून ग.स.मध्ये मनोज पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. लोकसहकार गटाचे ११ ते सहकार गटाकडे १० अशी विभागणी झाली होती. तत्पुर्वी कोरोनामुळे जून महिन्यात होणारी ग.स.सोसायटीची निवडणूक मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, लोकसहकार गटात अंतर्गत गटबाजी वाढल्यामुळे सहकार गटातील १० व लोकसहकारमधील ४ संचालकांनी गुरुवारी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीआधीच ग.स.वर प्रशासक नेमण्यात येवू शकतो.
अध्यक्ष मनोज चौधरी यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी
राजीनामे दिल्यानंतर लोकसहकार व सहकार गटातील संचालकांनी अध्यक्ष मनोज पाटील यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला असून, मनमानी पध्दतीने कामकाज केले जात असल्याचा आरोप सहकार गटाचे गटनेते उदय पाटील यांनी केला आहे. तर मनोज पाटील हे लोकशाही पध्दतीने कामकाज करत नसल्याचा आरोप लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर यांनी केला आहे. तसेच १४ संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे ग.स.सोसायटीचे कामकाम चालू राहू शकत नसल्याने प्रशासनाने ग.स.सोसायटीची निवडणूक जाहीर करण्याची मागणी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
दीड वर्षभरापुर्वी पडली होती फुट, पुन्हा ‘हायहोल्टेज ड्रामा’
मे २०१९ मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस सहकार गटात उभी फुट पडली होती. दीड वर्ष सहकार गटाने विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली तर लोकसहकार गटाने सत्ता प्राप्त केली होती. ग.स.सोसायटीत सहकार गटाने सत्ता प्राप्त केल्यानंतर पाच वर्षात सहकार गटात अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यातच पहिल्याच टप्प्यात अध्यक्ष झालेल्या सुनील सुर्यवंशी यांच्या विरोधात अनेक संचालकांनी बाजू घेतली होती. त्यातच नोटबंदीच्या काळात नोटा बदलण्याचा प्रकरणात सुर्यवंशी यांचे नाव आल्याने त्यांना संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा निवडणूक जवळ असताना ग.स.मध्ये पुन्हा ‘हायहोल्टेज ड्रामा’ सुरु झाला आहे.
या संचालकांनी दिला राजीनामा
उदय पाटील, विलास नेरकर, तुकाराम बोरोले, सुनील पाटील, अजबसिंग पाटील, कैलास चव्हाण, महेश पाटील, देवेंद्र पाटील, सुनील निंबा पाटील, विश्वास सुर्यवंशी, विद्यादेवी पाटील, रागिणी चव्हाण, भाईदास पाटील.
पुन्हा बदलणार राजकीय समीकरणं
दीड वर्षांपुर्वी सहकार गटात पडलेल्या फुटीमुळे ग.स.मधील राजकीय समीकरण बदलले होते. मात्र, कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होवू शकते अशा काळातच सहकार व लोकसहकार गटाने एकत्रितरित्या राजीनामे दिल्यामुळे पुन्हा समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसहकार गटाची स्वतंत्र भूमिका राहणार असल्याचे विलास नेरकर यांनी सांगितले असले तरी येणाऱ्या काळात पुन्हा सहकार गटाच्या माध्यमातून किंवा ग.स.मध्येही युतीव्दारे आगामी निवडणुका या दोन्ही गटाकडून लढणे जाण्याची शक्यता आहे.
कोट..
संस्थेच्या अध्यक्षांकडून मनमानी कारभार सुरु होता. त्यामुळे सत्ताधारी संचालकांचाही विश्वास त्यांनी गमावला होता. आता सोसायटीची मुदत संपली असून, लवकरच निवडणूक घेतली पाहिजे. यासाठी आम्ही राजीनामे दिले आहेत.
-उदय पाटील, गटनेते, सहकार गट
लवकरच निवडणुका जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत सभासदांसाठी व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी ती ऐकली नाही. यासह संचालकांना देखील विश्वासात घेतले जात नव्हते. त्यामुळे राजीनामे द्यावे लागले.
- विलास नेरकर, अध्यक्ष, लोकसहकार गट
१४ संचालकांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतची संपुर्ण माहिती घेवून आम्ही आमची भूमिका जाहीर करू.
-मनोज पाटील, अध्यक्ष, ग.स.सोसायटी