बळीराम पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:08+5:302021-09-11T04:19:08+5:30
जळगाव : बळीराम पेठ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने ...

बळीराम पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
जळगाव : बळीराम पेठ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीस पथकाने १२ हजार ९०० रुपयांचे साहित्य जप्त करून जुगार खेळणाऱ्या चौदा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बळीराम पेठेतील एका गोडाऊनच्या मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना गुरुवारी रात्री मिळाली. त्यांनी तातडीने पोलिसांचे विशेष पथक नेमून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पथकाने अचानक बळीराम पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी त्यांना १४ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळून १२ हजार ९०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामध्ये मोबाइल, रोकड व जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला, जमील खान, प्रवीण पाटील, आसिफ पिंजारी, भारत डोके यांनी केली आहे.
यांच्याविरुद्ध झाली कारवाई
संजय गोंधळी, सुरेश देवरे, प्रमोद वाणी, नजीर खान, शिवाजी पाटील, शेख नजीर, मजर कलीम पठाण, अशोक शर्मा, कलीम खान, सलीम गवळी, शेख यासीन, पन्नालाल सोनवणे, किशोर चव्हाण, जितेंद्र वाणी आदींवर कारवाई करण्यात आली.