बोदवड येथून जळगाव येथे हलविले उपचारासाठी
बोदवड : येथील गायी चोरी प्रकरणातील एका आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शहरातील जामठी रोडवर १० रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान गायी चोरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या टोळीतील दोन आरोपींना रस्त्यावर गस्तीवर असलेल्या नागरिकांनी पकडून बोदवड पोलिसांच्या स्वाधीन केले होते, त्यातील एक आरोपी शेख शोएब शेख उस्मान (रा. धाड, जि. बुलडाणा) तर दुसरा आरोपी मुझ्झफर अली असगर अली (वय २१, रा पाळधी, ता. धरणगाव) या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी सकाळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमोल गिरी यांनी केली होती. त्यानंतर पुन्हा दुपारी एक वाजता सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपींना बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर १० रोजी रात्री आठ वाजेदरम्यान आरोपी मुझ्झफर अली असगर अली याला गुप्तांगास गंभीर त्रास होत असल्याने बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्रास जास्तच असल्याने त्याला तातडीने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमोल गिरी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, सकाळी जेव्हा या आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते, तेव्हा त्याने पाठीखालील बाजूस त्रास होत असल्याचे सांगितले. आपण औषध देऊन त्याला पाठविले होते, तर रात्री मात्र त्याने गुप्तांगास जास्त त्रास होत असल्याचे सांगितल्याने आपण त्याला जळगावला सिटी स्कॅन व उपचारासाठी पाठविले आहे.
याबाबत मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, सदर आरोपी हा गायी चोरीच्या प्रकरणातील असून, पोलिसांसोबत त्याची झटापट झाली होती, तर त्यांच्याकडे चाकूही आढळून आला आहे.