नागपूरच्या नियोजित वधूने जामनेरच्या वरपक्षाला लावला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 18:29 IST2019-11-21T18:29:50+5:302019-11-21T18:29:55+5:30
सुमारे लाखाचा ऐवज लांबवला

नागपूरच्या नियोजित वधूने जामनेरच्या वरपक्षाला लावला चुना
जामनेर : मध्यस्थाकडून विवाह जुळल्यानंतर नागपूरला गेलेल्या जामनेर तालुक्यातील एका कुटुंबाला नियोजित वधूने दागिने व रोख असा सुमारे लाखाचा ऐवज लांबवून चुना लावला. फसविले गेलेले कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. मात्र काहीही उपयोग झाला नाही.
या बाबत सुरु असलेल्या चर्चेतून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील एका कुटुंबातील कर्ते मंडळी मुलासाठी मुलीचा शोध घेत होते. जळगाव येथील एका मध्यस्थाने त्यांना नागपूरचे एक स्थळ दाखविले. बोलणे झाले, देण्या घेण्याचेही ठरले. नागपूरला जाऊन थेट लग्न करण्याचा बेत ठरला.
मुलाकडचे त्या मध्यस्थासोबत नागपूरला खाजगी वाहनाने पोहचले. नियोजित वधू पसंत पडल्यानंतर तिला ठरल्याप्रमाणे दागिने व कपडे आदी वस्तू देण्यात आले. नोंदणी विवाह करावयाचे ठरले.
दागिने व कपडे आदी वस्तू घेऊन वधू तयार होण्यासाठी घरात गेली. तोपर्यंत मुलगा व मुलीकडचे गप्पा करीत बसले. बराच वेळ होऊनही वधू का येत नाही हे पाहून चलबीचल सुरु झाली. अखेर कुणीतरी घरात जाऊन पाहिल्यानंतर समजले की वधूने पोबारा केला. मुलाकडच्यांनी तिच्यासोबत आलेल्यांना विचारणा केली, असता आम्ही पाहून येतो असे सांगून तेही गेले आणि पुन्हा परतलेच नाही.
नियोजित वधूने आपल्याला चांगलाच चुना लावला याची खात्री पटल्यानंतर मुलाकडच्यांनी त्या मध्यस्थाला विचारले असता त्यानेही हात वर केले. अखेर त्या मध्यस्थासह मुलाकडील मंडळींनी नागपूर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी सर्व हकीकत ऐकून घेतली व मध्यस्थांचे व मुलाकडचे जबाब नोंदवून घेतले. या घटनेची त्या गावात चर्चा सुरु असून फसवणूक झालेल्या कुटुंबियांबद्दल सहानभूती व्यक्त होत आहे.