रावेर-पाल मार्गावर जागोजागी खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:29+5:302021-07-28T04:16:29+5:30
उटखेडा, ता. रावेर : मध्य प्रदेशातील झिरन्या, खरगोन, चित्तोडगढ या ठिकाणी जाणाऱ्या आंतरराज्यीय मार्गावर मुजलवाडी गावाजवळील पुलावर ...

रावेर-पाल मार्गावर जागोजागी खड्डे
उटखेडा, ता. रावेर : मध्य प्रदेशातील झिरन्या, खरगोन, चित्तोडगढ या ठिकाणी जाणाऱ्या आंतरराज्यीय मार्गावर मुजलवाडी गावाजवळील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरील रस्त्याच्या मध्यभागी खड्डे असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने मोठमोठे डबके तयार झाले आहे. या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे त्रासदायक ठरत आहे.
मुजलवाडी गावाला लागूनच नदीवरील पुलावर खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर मोठे ट्राले, केळीचे ट्रक व इतर लहान-मोठ्या वाहनांची दिवस-रात्र वर्दळ असते. या खड्ड्यांमधे पाणी असल्याने खोलीचा अंदाज येत नसून अनेक मोटारसायकली येथे पडल्या असून बरेच वाहनधारक जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पुलावर असलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे, अशी मागणी येथील सरपंच योगेश पाटील, काँग्रेसचे रावेर शहराध्यक्ष संतोष पाटील व वाहनधारकांनी केली आहे.
सरपंचांनी केले स्वखर्चाने काम
मुजळवाडी गावाला लागून असलेल्या नदीवरील पुलावर साचलेल्या घाण पाण्यामुळे व चिखलामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे पाहून गावातील सरपंच योगेश पाटील यांनी ‘माझा गाव माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून त्यांनी स्वखर्चाने या पुलावरील गवत, घाण पाणी व चिखलाची साफसफाई केली असून पुलावर असलेले पाण्याचे पाईप साफ करून पाण्याचा मार्ग मोकळा केला. या पुलावरील खड्ड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित मुरूम टाकून दुरुस्ती करावे, अशी मागणी केली आहे.
मुजलवाडी येथील पुलावर सरपंच योगेश पाटील व सहकारी साफसफाई करताना. (छाया: गणेश पाटील)