तृप्ती धोडमिसे : प्रशासकीय सेवेतून समाजसेवेचा अनोखा मानस
जळगाव : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर ते यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी अनेक दिवसांची मेहनत असते. अशाच प्रकारे मेहनत घेत, स्वत:ची क्षमता ओळखून अंतप्रेरणेने काम केल्यास कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळते, असा सल्ला स्वअनुभवातून परीविक्षाधीन अधिकारी म्हणून भडगाव येथे तहसीलदार पदाची जबाबदारी संभाळणाऱ्या तृप्ती धोडमिसे यांनी दिला.
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व घरात कोणताही प्रशासकीय सेवेचा वारसा नसलेल्या तृप्ती धोडमिसे यांचा प्रवास हा आजच्या युवापिढीसाठी खरोखरच प्रेरणादायी ठरणारा आहे. युवा दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांचे शिक्षण, घरच्या मंडळींचे पाठबळ, नोकरी व त्यानंतर स्पर्धा परीक्षा आणि या माध्यमातून प्रशासकीय सेवा या सर्वांमधून एका अनोख्या जिद्दीचे दर्शन घडते.
प्रशासकीय सेवेतून जनसेवा
तृप्ती धोडमिसे या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मूळ रहिवासी. आई-वडील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक. त्यामुळे सुरुवातीपासून शिक्षणाची मोठी आवड असलेल्या तृप्ती धोडमिसे यांनी आपली ही आवड कायम जपली. पुणे येथे रयत शिक्षण संस्थेत मराठी माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर एका नामांकित कंपनीत त्यांना नोकरीही मिळाली. मात्र केवळ नोकरी न करता आपल्या हातून समाजाची सेवाही घडावी, सामाजिक कार्य घडावे, या विचारातून त्यांनी सामान्यांसाठी काम करण्याचा मानस व्यक्त केला. यात आपल्यामध्ये क्षमता असून आपण प्रशासकीय सेवेत काम करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना होताच. त्यामुळे आपल्या या क्षमतेचा योग्य उपयोग करण्यासाठी त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व त्या त्यात यशस्वीदेखील झाल्या. विशेष म्हणजे नोकरी करून त्यांनी हे यश मिळविले. त्यानंतर त्यांनी पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व २०१९मध्ये त्यांनी यश संपादन केले. त्या केवळ उत्तीर्णच झाल्या असे नाही तर नागरी सेवा परीक्षेत त्यांनी राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला.
जळगाव जिल्ह्यात सेवेची संधी
लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना परीविक्षाधीन अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यात सेवेची संधी मिळाली. यात सध्या त्या भडगाव येथे तहसीलदार म्हणून जबाबदारी संभाळत असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या या काळात त्या चोखपणे कर्तव्य बजावत आहेत.
स्वत:ची क्षमता ओळखल्यास यशाचा टप्पा
कोणत्याही क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणाची प्रेरणा आहे, असे हमखास ठरलेले असते. यात कोण काय करते, हे न पाहता अर्थात बाह्यप्रेरणा न पाहता अंतप्रेरणेतून आपला मार्ग निवडा, असा सल्ला तृप्ती धोडमिसे यांनी आजच्या युवापिढीला दिला.