अपघातात मृत्यू झालेल्या 'त्या' व्यक्तीची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 22:41 IST2021-01-29T22:41:01+5:302021-01-29T22:41:11+5:30
कामाच्या शोधात निघाले होते पायी : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

अपघातात मृत्यू झालेल्या 'त्या' व्यक्तीची ओळख पटली
जळगाव - जैन पेट्रोल पंपाजवळील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी अज्ञात कंटेनरच्या धडकेत पायी जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीची ओळख पटली असून राजेश मदन राजपूत (४५, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आकाशवाणी चौकाजवळील जैन पेट्रोलपंपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राजेश राजपूत हे कामाच्या शोधात पायी जात होते. त्याच दरम्यान मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रिक्षातून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतर दुपारी उपचारादरम्यान जखमी राजेश राजपूत यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात घेतली धाव
महामार्गावर अपघात झाल्याची बातमी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नातेवाईकांनी रात्री उशीरा जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. त्यानंतर मयताची ओळख पटली. राजेश हे पत्नी, मुलगा व एक मुलगीसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. ते कामाच्या शोधात होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे करीत आहे.