लोकप्रतिनिधी विसरले निवडणुकीतील आश्वासन पूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:53 AM2020-09-21T00:53:46+5:302020-09-21T00:54:58+5:30

चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे.

People's representatives fulfill election promises forgotten | लोकप्रतिनिधी विसरले निवडणुकीतील आश्वासन पूर्ती

लोकप्रतिनिधी विसरले निवडणुकीतील आश्वासन पूर्ती

Next
ठळक मुद्देजागतिक विसरभोळे दिन विशेषभुसावळ शहरवासीयांचे विविध प्रश्न सोडविण्याची जनतेला अपेक्षा

वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. शहरातील रस्ते, पाणी, क्रीडा संकुल, उड्डाणपूल, प्लॅस्टिक पार्क, गटारी, दिवाबत्ती, कचरा निर्मूलन असे विषय साडेचार वर्षे उलटूनही सुटलेले नाहीत. ‘जागतिक अल्झायमर्स डे’ अर्थात ‘जागतिक विसरभोळे दिन’ २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त निवडणुकीनंतर आश्वासनांच्या पूर्ततेवर नजर टाकली असता विविध बाबी प्रकर्षाने समोर येतात.
रेल्वे जंक्शन ओळख
शहरात प्रचंड नागरी समस्या आहेत. याचा भुसावळवासीयांना पदोपदी अनुभव येत आहे. यात अमृत योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची झालेली वाताहत असो, ७ दिवसाआड होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारी किंवा स्वच्छतेचा प्रश्न सर्व बाबतीत आश्वासन पूर्ती झालेली नसल्याचे दिसून येते.
‘अमृत’मुळे रस्त्यांची लागली वाट
अमृत योजनेमुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे वाहने चालवणे तर दूरच, पायी चालणेही कठीण झाले आहे. याशिवाय भरपावसाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध असतानासुद्धा जीर्ण, कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेमुळे सातव्या दिवशी भुसावळकरांना पाणी मिळत आहे.
रेल्वे हद्दीतील अतिक्रमण उठले
रेल्वे प्रशासनाने सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी रेल्वे हद्दीतील एक जणू छोटे बसलेले शहरच उद्ध्वस्त केले. अतिक्रमण काढताना त्यावेळी याठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी होणार असून, स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल, अशी आश्वासने नागरिकांना देण्यात आली होती. रोजगार तर मिळालाच नाही, घरे मात्र उद्ध्वस्त झाली.
क्रीडा संकुल वनवासात
क्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात अनेक खेळाडू प्रतिभावंत, गुणवंत आहेत. रेल्वे मैदान किंवा खासगी संस्थेच्या मैदानावर सराव करून ते खेळांमध्ये नैपुण्य दाखवत असतात, मात्र हक्काचे क्रीडा संकुल नाहीच. क्रीडा संकुलाचाही विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गल्लोगल्ली ‘डॉन’
शहरात गल्लोगल्ली ‘डॉन’ निर्माण झाले आहेत. गावठी कट्टे, तलवारी बाळगणे व त्याचा वापर करणे हे भुसावळमध्ये जणू फॅशन झाले आहे. भरदिवसा २०-२१ वयोगटातील मुले खून करतात; यावरही अंकुश असणे महत्त्वाचे आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्योग-व्यवसाय भुसावळपासून दूर जात आहेत.
अजेंड्याचा विसर
उद्यान विकास , शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा भुयारी मार्ग, शहरात बंदिस्त नाट्यगृह, नगरपालिकेच्या दवाखान्याचे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर, शाळांना नवीन खोल्या आणि सर्वांगीण शैक्षणिक विकास हा अजेंडा देण्यात आला होता. मात्र यात यश मिळाल्याचे दिसत नाही की विसरभोळेपणा झाला हे समजत नाही.
तांत्रिक अडचणीशी काय घेणे?
शासकीय योजना, प्रकल्प करीत असताना यात तांत्रिक अडचणी येत असतात. किचकट कागदोपत्री प्रक्रिया करावी लागते हे सर्वश्रुत आहे, यानंतरच विकास कामांचे मार्ग मोकळे होतात. मात्र सामान्य नागरिकांना तांत्रिक अडचणीशी काही घेणेदेणे नसते. त्यांना फक्त हवी असते कृती... तीही विसरभोळेपणा ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: People's representatives fulfill election promises forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.