सासऱ्यांच्या अतिक्रमणामुळे लोकनियुक्त सरपंच अपात्र! म्हसवे ग्रा.पं.तील सदस्यावर कारवाईची कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 14:05 IST2023-03-28T14:01:15+5:302023-03-28T14:05:12+5:30
ज्योती सतीश संदानशिव असे अपात्र ठरलेल्या लोकनियुक्त सरपंचाचे नाव असून उषा दीपक सैंदाणे या सदस्यांवरही ही कारवाई करण्यात आली आहे.

सासऱ्यांच्या अतिक्रमणामुळे लोकनियुक्त सरपंच अपात्र! म्हसवे ग्रा.पं.तील सदस्यावर कारवाईची कुऱ्हाड
- कुंदन पाटील
जळगाव : आजल सासऱ्यांनी व सासऱ्यांनी केलेल्या शासकीय जमिनींवरच्या अतिक्रमणामुळे अनुक्रमे म्हसवे येथील लोकनियुक्त सरपंच व एका महिला सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे.
ज्योती सतीश संदानशिव असे अपात्र ठरलेल्या लोकनियुक्त सरपंचाचे नाव असून उषा दीपक सैंदाणे या सदस्यांवरही ही कारवाई करण्यात आली आहे.माधुरी खंडू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींवर सुनावणी सुरु ठेवली होती.ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी प्रत्यक्ष अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.
त्यानुसार संदानशिव यांचे आजल सासरे भागवत उदा संदानशिव यांनी शासकीय जमिनीवर १९८ चौरस फूट अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. तर ग्रा.पं. सदस्या उषा दीपक सैंदाणे यांचे सासरे मगन खंडू सैंदाणे यांनी १६१ चौरस फूट अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती संदानशिव यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून तर उषा सैंदाणे यांना सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे.