कोरोना नियमांचा प्रवाशांना विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:38+5:302020-12-03T04:29:38+5:30

भुसावळ : सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढली असून, या प्रवाशांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र आहे. बसेसमध्येही पूर्ण क्षमतेने ...

Passengers forget the Corona rules | कोरोना नियमांचा प्रवाशांना विसर

कोरोना नियमांचा प्रवाशांना विसर

भुसावळ : सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढली असून, या प्रवाशांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र आहे. बसेसमध्येही पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक केली जात आहे; मात्र गर्दीमुळे कोरोनासंदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे सहा महिने एस.टी.महामंडळाची सेवा बंद होती. सुरुवातीला निम्म्या संख्येने व नंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली गेली. दिवाळी सणाला प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली; परंतु नियमांचे पालन होताना दिसत नसल्याने चिंता आहे.

----

तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव

रावेर : तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर आता तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली. यावर्षी अतिवृष्टीमुळे ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका व सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून गेले. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा तुरीवर होत्या.

-------

भाजीपाला स्वस्त झाल्याने दिलासा

मुक्ताईनगर : शहरात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर कमी झाले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरात रविवारी कोथिंबिरीच्या दोन जुड्यांची दहा रुपयाला एक या प्रमाणे विक्री होत होती, तसेच मेथी, शेपू, पोकळाची दहा रुपये जुडी तर पंधरा रुपयाला दोन जुड्या या प्रमाणे विक्री होत होती. कोरोनामुळे भाजीपाल्यासह सर्व वस्तूंचे दर वाढले होते; परंतु आता भाव कमी होत असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

----

शहरात सातत्याने पाण्याची नासाडी

बोदवड : जलवाहिन्यांच्या गळतीमुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे. वलवाडीसह शहरातील बहुतांश भागात आठ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे अनेक भागात वेळेत पाणी पुरवठा होत नाही. त्यातच शहरातील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत, तसेच काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे.

----

कीटकनाशकाच्या दरांमुळे शेतकरी त्रस्त

रावेर : खते, कीटकनाशके यांच्या वाढत्या दरावर कुठलेही निर्बंध नसल्याने व्यापारी अव्वाच्या सव्वा भावाने त्याची विक्री करीत आहेत. हे दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने, सवलतीच्या दरात खते, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आहे.

----

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ!

भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. दुपारी उकाडा तर रात्री थंडी वाजत असते. या बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे रुग्णालयेही गर्दीने खचाखच भरलेली दिसून येतात.

-------

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा!

सावदा : शहरात धूर सोडत धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी आहे.

---------

दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ!

भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे. बसस्थानकातून सर्वात जास्त दुचाकी लांबविल्या जातात. यामुळे वाहनधारकांचे नुकसान होत असून, पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

------

बंदी असतानाही गुटख्याची विक्री

चिनावल, ता.रावेर : बंदी असतानाही तालुक्याच्या अनेक भागात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. पोलिसांतर्फेही थातुरमातुर कारवाई होते. दोन-तीन दिवस गुटखा विक्री बंद असते. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. गुटखा विक्री कायमची बंद करावी.

-------

खराब साईडपट्ट्यांमुळे अपघात वाढले!

मुक्ताईनगर : राष्ट्रीय महामार्ग हा परिसरातून गेला आहे; मात्र सद्य:स्थितीत येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या साईडपट्ट्या खराब झाल्या आहेत. साईडपट्ट्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

----

महामार्गावरील दिशा फलकांची दुरवस्था

भुसावळ : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर फलक लावण्यात आले आहेत; मात्र त्यांची पार दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना अडचणी येतात. महामार्गांवर नवीन दिशादर्शक फलक बसविण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Web Title: Passengers forget the Corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.