Pankaja Munde, Rohini Khadse were not defeated but defeated - Eknath Khadse | पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंचा पराभव झाला नसून त्यांना पाडले - एकनाथ खडसे
पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंचा पराभव झाला नसून त्यांना पाडले - एकनाथ खडसे

जळगाव: पक्षांतर्गत कुरघोड्या करतानाच पक्षाच्या उमेदवारांविरूद्ध कारवाया करून उमेदवारांना पाडण्याचे उद्योग झाले. अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनाही अशाच रितीने पाडण्यात आले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचाही असाच आरोप आहे. हे उद्योग करणाऱ्यांची नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पुराव्यासह देऊन कारवाईची मागणी केलेली आहे. त्यावर कारवाईची प्रतीक्षा आहे, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जळगाव येथील ‘मुक्ताई’ बंगल्यावर खडसे यांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर तसेच राज्यातील घडामोडींवर त्यांचे मत जाणून घेतले. खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला नसून पक्षांतर्गतच कटकारस्थान करुन त्यांना पाडण्यात आले. त्यांच्या विरोधातील उमेदवार धनंजय मुंडे यांना मदत पुरविली गेली, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्याबाबत तर उघडपणे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले. त्यांची नावे मला स्वत:लाच माहिती आहेत. ही नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळविली. मात्र अजूनही पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. कारवाईची वाट पाहत आहोत.

‘त्या’ अस्वस्थ असल्या तरी काय निर्णय घेणार? याची माहिती नाही. त्यांनी माझ्याशी याबाबत चर्चा केलेली नाही. तसेच गोपीनाथराव मुंडे असल्यापासून भगवान गडावर नियमितपणे जात होतो. आताही पंकजा यांनी बोलविले तर गोपीनाथ गडावर जाणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी अल्पकाळातील मुख्यमंत्रिपदाच्या काळात केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी परत पाठविल्याच्या आरोपात तथ्य वाटत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

पक्षांतराची शक्यता फेटाळली
शिवसेना प्रवेशाबाबत तुमचीही चर्चा होती? अशी विचारणा केली असता, ५ वर्षांत २५ वेळा चर्चा झाली, जाईल तर तुम्हाला सांगून जाईल, अशा शब्दांत त्यांनी पक्षांतराची शक्यता फेटाळली.

Web Title: Pankaja Munde, Rohini Khadse were not defeated but defeated - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.