ओटीपी क्रमांक विचारुन प्राचार्यांना दीड लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:14 IST2019-03-29T12:13:47+5:302019-03-29T12:14:44+5:30
आॅनलाईन फसवणूक : सायबर पोलिसात गुन्हा दाखल

ओटीपी क्रमांक विचारुन प्राचार्यांना दीड लाखाचा गंडा
जळगाव : प्राईम कार्डचे वार्षिक शुल्क परत करण्याच्या नावाखाली एटीएम व डेबीट कार्डचा ओटीपी व १६ अंकी क्रमांक विचारुन अजय ओंकारनाथ दहाड (४८, रा.द्रौपदी नगर, जळगाव) यांना एका ठगाने १ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहाड हे चांदवड, जि.नाशिक येथे खासगी शाळेत प्राचार्य आहेत. तेथेच स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत त्यांचे बचत खाते आहे. २३ मार्च रोजी जळगावात घरी असताना दुपारी दोन वाजता त्यांना एका ठगाने फोन करुन प्राईम कार्डचे ३ हजार ५३९ रुपये परत करावयाचे असल्याने त्यासाठी क्रेडीट कार्ड १६ अंकी क्रमांक व ओटीपी क्रमांक विचारला.
दहाड यांनी त्यावर विश्वास ठेवून क्रमांक सांगितला असता लगेच अनुक्रमे १लाख २४ हजार ९००, ३९ हजार ९०० व २ हजार असे एकूण १ लाख ६६ हजार ८०० रुपयांची आॅनलाईन खरेदी केली.युनिकॉर्न इन्फोसोल्युशन प्रा.नवी दिल्ली या खात्यावर हे पैसे वर्ग झाल्याचे बॅँक स्टेटमेंटमधून निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ब्रोकरलाही ४० हजारात फसविले
नागेश्वर कॉलनीतील ब्रोकर योगेश सदानंद अहिरराव यांनाही ४० हजार १८८ रुपयांना गंडविण्यात आले आहे. १० मार्च रोजी ठगाने तीन आॅनलाईन अॅपच्या माध्यमातून आठ वेळा आॅनलाईन पैसे हस्तांतर करण्यात आले आहेत. १० हजार, सहा वेळा २ हजार व एक वेळा १८ हजार १८८ रुपये वळविण्यात आले. महाबळमधील स्टेट बॅँक शाखेतून ठोस माहिती न मिळाल्याने अहिरराव यांनी बुधवारी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.