वृद्ध महिलेला उदरनिर्वाहासाठी सहा मुलांनी खावटी देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:54+5:302021-07-14T04:19:54+5:30
अमळनेर : गांधलीपुरा भागातील ९० वर्षीय महिलेला हयातीपर्यंत सहा मुलांनी उपजीविका व औषधोपचारासाठी दरमहा खावटी द्यावी, असे आदेश ज्येष्ठ ...

वृद्ध महिलेला उदरनिर्वाहासाठी सहा मुलांनी खावटी देण्याचे आदेश
अमळनेर : गांधलीपुरा भागातील ९० वर्षीय महिलेला हयातीपर्यंत सहा मुलांनी उपजीविका व औषधोपचारासाठी दरमहा खावटी द्यावी, असे आदेश ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत.
गांधलीपुरा भागातील केसरबाई रमजान तेली (९०) यांनी ज्येष्ठ नागरिक पोटगी व आरोग्य कायद्यानुसार पीठासीन अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. बाबू रमजान तेली, कांती रमजान तेली, करीम रमजान तेली, जलाल रमजान तेली, रहीम रमजान तेली ही पाचही मुले गेल्या आठ वर्षांपासून आई या नात्याने माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांनी औषध, अन्न व कपड्यांचा खर्च मागितला असता देण्यास नकार दिला. तसेच तिला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. तिचा उदरनिर्वाह सहावा मुलगा रज्जाक तेली हा करीत असून तो सध्या कोरोनाच्या महामारीमुळे बेरोजगार झाला आहे. त्यामुळे तो सक्षम नाही म्हणून सर्व मुलांनी खावटी द्यावी, अशी मागणी तिने पीठासीन अधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार अहिरे यांनी सहाही मुलांना नोटिसा काढून खुलासा मागवला होता. सर्वांचा खुलासा आल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी बाबू तेली, कांती तेली, रहीम तेली, जलाल तेली व करीम तेली या पाच मुलांनी वृद्ध महिलेला ती हयात असेपर्यंत प्रत्येकी दोन हजार तर रज्जाक याने एक हजार रुपये प्रति महिना खावटी द्यावी, असा निकाल दिला आहे. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याचेही आदेशात म्हटले आहे.