लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 05:32 IST2025-05-10T05:32:07+5:302025-05-10T05:32:38+5:30
कन्येचा वाढदिवस असल्याने ते सुटीवर आले होते. गुरुवारी ते अमळनेर येथे घरी पोहचले आणि काही वेळातच त्यांना फोन आला.

लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर (जि. जळगाव) : कन्येच्या वाढदिवसासाठी ढेकुसिम, ता. अमळनेर येथे गावी आलेले सैनिक शांताराम प्रताप सोनवणे (४२) हे चार तासातच ड्यूटीवर परतले आहेत. ढेकुसिम गावातील रहिवासी असलेले जवान शांताराम सोनवणे हे जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत.
कन्येचा वाढदिवस असल्याने ते सुटीवर आले होते. गुरुवारी ते अमळनेर येथे घरी पोहचले आणि काही वेळातच त्यांना फोन आला. युद्धजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला परत यावे लागेल आणि ड्यूटी जॉइन करावी लागेल, असा संदेश त्यांना मिळाला. एकीकडे देश आणि दुसरीकडे लाडक्या मुलीचा वाढदिवस अशा अवस्थेत जवान शांताराम सोनवणे यांनी मुलीचा वाढदिवस साजरा करून शक्य तितक्या लवकर कर्तव्यावर हजार होण्यासाठी निघत असल्याचा निरोप आपल्या अधिकाऱ्यांना दिला.
माजी सैनिक शरद पाटील यांनी लागलीच केक मागवला, केक आणून मुलीच्या वाढदिवस साजरा केला आणि शांताराम सोनवणे हे ड्यूटीसाठी पुन्हा परत जाण्यासाठी निघाले. ते घरी येऊन केवळ चारच तास झाले होते. या जवानाला निरोप देण्यासाठी गावातील मित्र परिवार जमला होता.