मुक्ताईनगर येथे मागणीच्या ६० टक्केच पुस्तके प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:23+5:302021-08-01T04:15:23+5:30
मुक्ताईनगर : समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत पाठ्यपुस्तक उपक्रमांतर्गत वर्ग १ ते ८ साठी मुक्ताईनगर तालुक्यात मराठी ...

मुक्ताईनगर येथे मागणीच्या ६० टक्केच पुस्तके प्राप्त
मुक्ताईनगर : समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत पाठ्यपुस्तक उपक्रमांतर्गत वर्ग १ ते ८ साठी मुक्ताईनगर तालुक्यात मराठी आणि उर्दू माध्यमाची एकूण ७४ हजार ५२६ पुस्तके शुक्रवारी प्राप्त झाली आहेत. सरासरी ६० टक्केच पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके शहरातील तु. ल. कोळंबे विद्यालयात सुरक्षित जागी उतरविण्यात आली आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातून वर्ग १ ते ८ साठी मराठी माध्यमाच्या १ लाख १० हजार ९४ पुस्तकांची मागणी होती. यातून ६४ हजार ६०२ पुस्तके प्राप्त झाली आहेत. तर उर्दू माध्यमासाठी १३ हजार ९४७ पुस्तकांची मागणी होती. यातून ९ हजार ९२४ पुस्तके शुक्रवारी दुपारी प्राप्त झाली आहेत.
एकंदरीत, मागणीच्या सरासरी ६० टक्के पुस्तके पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत.
कोरोना काळामुळे जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांकडे पुस्तकेच नसल्याने सरावासाठी अडचणी येत आहेत. अशात आता पुस्तके तालुक्यातील मुख्यालयात पोहोचल्याने लवकर पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडतील, अशी अपेक्षा आहे.
आलेल्या पुस्तकांमध्ये पहिली, सहावी, सातवी आणि आठव्या वर्गातील पुस्तके अधिकतर कमी आहेत. त्या तुलनेत दुसरी, तिसरी आणि चौथीची पुस्तके गरजेनुसार प्राप्त झाली आहेत.
यावेळी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या नियोजनानुसार सर्व विषयतज्ज्ञ, समावेशित शिक्षण समन्वयक आणि सर्व विषय शिक्षक उपस्थित होते.