सत्रासेन ते लासूर दरम्यान एक लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 17:26 IST2021-02-24T17:25:57+5:302021-02-24T17:26:26+5:30
चोपडा शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर एका गाडीत एक लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

सत्रासेन ते लासूर दरम्यान एक लाखाचा गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : सातपुडा पर्वत रांगेतून येणारा बलवाडी सत्रासेन लासुर-चोपडा या रस्त्यावर सत्रासेन ते लासुर या दोन गावांच्या दरम्यान चोपडा शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर एका गाडीत एक लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यासह दीड लाख रुपये किमतीची कार असा अडीच लाख रु किंमतीचा ऐवज चोपडा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून जप्त केला.
दिनांक २३ रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास लासुर ते सत्रासेन रोडवर सागा पावरा यांचे शेताजवळ आरोपी अमरनाथ भिवसन माळी (३४, लासुर) येथील आरोपी त्याच्या ताब्यात असलेल्या गाडीत हा अवैध गुटखा घेऊन येत असताना पोलिसांनी छापा टाकून पकडले.
त्यात ३८ हजार८९६ रुपये किमतीचे विमल पान मसाला गुटखा चे २०८पाकिटे, सहा हजार८६४ रुपये किमतीचे तंबाखूचे २०८ विमल पान मसाला चे पाकिटे, चार हजार ३३४ रुपये किमतीचे जी१ तंबाखूचे १९८ पाकिटे, १ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण दोन लाख ३९ हजार २९८ रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अमरनाथ माळी यांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक रितेश शिवाजी चौधरी यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अमरनाथ भिवसन माळी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत. आरोपीस चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.