शिक्षिकेची बालसंगोपण रजा मंजूर करण्यासाठी घेतली दीड हजाराची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:45 IST2019-11-20T22:45:39+5:302019-11-20T22:45:45+5:30
एसीबीची कारवाई : जि.प.शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहायक जाळ्यात

शिक्षिकेची बालसंगोपण रजा मंजूर करण्यासाठी घेतली दीड हजाराची लाच
जळगाव : शिक्षिकेची बाल संगोपण रजा मंजूर करण्यासाठी तिच्या पतीकडून दीड हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक चेतन भिका वानखेडे (४२, रा.धरणगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात रंगेहाथ पकडले.
दरम्यान, वानखेडे याला अटक करण्यात आली असून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी मनपाच्या चौकीदाराला पकडताना जो फंडा वापरण्यात आला होता, तोच फंडा वानखेडे याला पकडताना वापरण्यात आला. तक्रारदाराने खिशातील चष्मा काढून तो डोळ्याला लावला.
म्हसावद, ता.जळगाव येथील तक्रारदाराची पत्नी शिक्षिका असून त्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याकडे तक्रार केली. ठाकूर यांनी तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर बुधवारी निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, मनोज जोशी, प्रशांत ठाकुर,प्रविण पाटील, नासिर देशमुख,ईश्वर धनगर, व महेश सोमवंशी यांच्यासोबत जिल्हा परिषदेत सापळा लावला. तक्रारदाराने खिशातील चष्मा डोळ्याला लावताच पथकाने वानखेडे याला पकडले.