त्या’ वृध्दाचा अखेर मृत्यू; इन कॅमेरा शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:14+5:302021-09-06T04:20:14+5:30
जळगाव : मायादेवी नगरातील रोटरी भवन येथील केंद्रावर लसीकरण केंद्रावर प्रकृती बिघडलेल्या काशिनाथ भावडू सोनार (वय ७५, रा. समता ...

त्या’ वृध्दाचा अखेर मृत्यू; इन कॅमेरा शवविच्छेदन
जळगाव : मायादेवी नगरातील रोटरी भवन येथील केंद्रावर लसीकरण केंद्रावर प्रकृती बिघडलेल्या काशिनाथ भावडू सोनार (वय ७५, रा. समता नगर) यांचा रविवारी पहाटे दोन वाजता खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. लसीकरण व त्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यानेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोनार यांच्या मुलाने केला आहे. दरम्यान, नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. छायाचित्रकार न मिळाल्याने त्यालादेखील विलंब झाला.
काशिनाथ सोनार शनिवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास मायादेवी नगरातील लसीकरण केंद्रावर चक्कर येऊन पडल्याची घटना घडली होती. लसीकरणानंतर त्यांना चक्कर तसेच रक्दाबाचा त्रास झाला. तब्बल पाऊण तास सोनार हे केंद्रावर होते. त्यानंतर दुपारी त्यांचा मुलगा जितेंद्र याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना काशिनाथ यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊ वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. लसीकरण केंद्रावर वेळेवर उपचार मिळाले असते तर वडिलांचा जीव वाचला असता. उपचारास विलंब व लसीकरणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप जितेंद्र सोनार यांनी केला. मृत्यूचे कारण समोर यावे यासाठी इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी व शिवाजी धुमाळ यांनी जिल्हा रुग्णालय गाठून कुटुंबीयांचे म्हणणे समजून घेत, इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची तयारी केली.
चार तासांनंतर इन कॅमेरा शवविच्छेदन
छायाचित्रकार न मिळाल्याने इन कॅमेरा शवविच्छदेनासाठी मृतदेह ताटकळत राहिला. १ वाजेच्या सुमारास खासगी छायाचित्रकार मिळाला. त्यानंतर डॉ. वैभव सोनार यांनी इन कॅमेरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डोक्यात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काशिनाथ यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, दोन विवाहित मुले जितेंद्र, विजय व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.