जळगाव : चार अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या रशीद उर्फ पापा सलाम शेख (वय ४५,रा.पाळधी, ता.धरणगाव) याला जिल्हा न्यायालयाने गुरुवारी तीन वर्ष सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुनावणीच्यावेळी चारही पीडित मुलींनी आपल्यावर बेतलेला प्रसंग जसाचा तसा न्यायालयात सांगितला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांनी हा निकाल दिला. शिक्षा सुनावताच रशीद याला पोलिसांनी ताब्यात घेत कारागृहात रवानगी केली.
२९ मार्च २०१४ रोजी ही घटना घडली होती. सहायक सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी चारही पीडितांची न्यायालयात साक्ष घेतली. त्यात त्यांनी आपल्यावर जो प्रसंग बेतला तो जसाचा तसा सांगितला. यात ९ जणांच्या साक्षी व पुराव्यावरून न्यायालयाने रशीद याला दोषी ठरविले. त्याची आत्या शबनुरबी उर्फ छबी शेख मुराद हिला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.