ओ शेठ... तुम्ही नाद कराल तर जाल जेलमध्ये थेट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:02+5:302021-09-19T04:17:02+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट... म्हणत जर तुम्ही रस्त्यावरच वाढदिवसाचा बार ...

ओ शेठ... तुम्ही नाद कराल तर जाल जेलमध्ये थेट...
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट... म्हणत जर तुम्ही रस्त्यावरच वाढदिवसाचा बार फोडणार असाल, तर सावधान... रस्त्यावर वाढदिवस साजरा करत नेतेपणाची हौस भागवून घेतली तरी वर्षाचा तुमचा अविस्मरणीय दिवस पोलीस कोठडीतही जाऊ शकतो. कारण, या प्रकारांवर आळा घालण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर धारदार शस्त्रांचा वापर करून वाढदिवस साजरा करताना आढळल्यास बर्थ डे बॉयला त्यांचा केक तुरुंगात खावा लागणार आहे.
शहरातील गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या सुमारास मुलाचा, नेत्याचा किंवा विद्यार्थ्याचा तसेच दादांचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या सुरू आहे. भाईगिरीची क्रेझ असलेले युवक धारदार शस्त्र जसे की, तलवार, चाकू, कोयता आदीने केक कट करून डीजेच्या आवाजावर थिरकून वाढदिवस साजरा करत असतात. यामुळे नियमांचे उल्लंघन होते आणि याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे शस्त्रांचा वापर करून किंवा इतर नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ़ प्रवीण मुंढे यांनी सांगितले आहे.
तर गुन्हा होणार दाखल
- रस्त्यावर वाहन उभे करून केक कापणे.
- केक कापताना तलवार, चाकूसारखे शस्त्र वापरणे.
- डीजे-गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे.
- भाईगिरीचे भूत असल्याने हा प्रकार सोशल मीडियावर अपलोड करणे.
- शांतता भंग करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणे.
रस्त्यावर दंगा नकोच
शहरातील सहाही पोलीस ठाण्यांच्यावतीने रात्री विशेष गस्त सुरू असते. त्यात नियंत्रण कक्षात अथवा पोलीस ठाण्यात कोणी कॉल करून तक्रार केल्यासही पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करतात. त्यामुळे उत्साहाच्या भरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे महागात पडू शकते.
विकृत पद्धतीत होतेय वाढ
सोशल मीडिया येण्यापूर्वी काही मोजक्याच क्षेत्रातील व्यक्तींचा, लहान मुलांचा अथवा ज्यांच्याकडे संपत्ती, प्रतिष्ठा आहे अशा व्यक्तींचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असे. त्याची चर्चा सर्वत्र व्हायची. मात्र, सोशल मीडियामुळे आता कुणीच मागे राहिले नाहीत. वाढदिवस हा जीवनातील अविस्मरणीय दिवस समजला जातो. त्यासाठी मित्रांसह आई-वडील, नातेवाईकांचा आशीर्वाद व शुभेच्छांची जोड महत्त्वाची ठरते. मात्र, आता त्याला फाटा देत वाढदिवस म्हणजे मौजमजा, सेलिब्रेशन, धांगडधिंगा अशा प्रवृत्तीत वाढ होत आहे. विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅड सध्या जोमात आहे.
-------
रात्रीच्या वेळी शांततेचा भंग होऊ नये यासह अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी नियमित गस्त सुरू असते. त्यामुळे कोणीही नियमभंग करून गर्दी जमवून रस्त्यावर वाढदिवस साजरा करू नये. तसेच शस्त्रांचा वापर करून वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव