रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:14+5:302021-07-31T04:17:14+5:30
सचिन देव जळगाव : गेल्या महिन्यापासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर, रेल्वे प्रशासनातर्फे पॅसेंजर वगळता ९० टक्के एक्स्प्रेस गाड्या ...

रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात !
सचिन देव
जळगाव : गेल्या महिन्यापासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर, रेल्वे प्रशासनातर्फे पॅसेंजर वगळता ९० टक्के एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. गाड्यांची संख्या वाढल्याने काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोयही थांबली आहे; मात्र अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या स्टेशनवर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा नसल्यामुळे येथील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढविल्यानंतर थांब्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या गाड्यांमध्ये अनेक गाड्यांना जळगाव स्टेशननंतर पाचोरा व चाळीसगाव येथे थांबा आहे; मात्र लांब पल्ल्याच्या असणाऱ्या गोवा एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, गरिबरथ एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना या संबंधित गाड्यांनी बाहेरगावी प्रवास करायचा असल्यास, त्यांना जळगावला यावे लागत आहे. त्यामुळे या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत प्रवासी संघटनांतर्फे अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे; मात्र इतक्या वर्षात यातील एकाही गाडीला संबंधित स्टेशनवर थांबा देण्यात आलेला नसल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- हावडा एक्स्प्रेस
- सेवाग्राम एक्स्प्रेस
- महाराष्ट्र एक्स्प्रेस
- काशी एक्स्प्रेस
- विदर्भ एक्स्प्रेस
- महानगरी एक्स्प्रेस
इन्फो :
या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?
- जळगाव स्टेशननंतर पाचोरा रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची नेहमी वर्दळ असते; मात्र या स्टेशनवर सध्या सुरू असलेल्या गाड्यांपैकी मोजक्याच गाड्या थांबत आहेत. त्यामुळे या स्टेशनवरही गोवा, कर्नाटक, गीतांजली आदी एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची प्रवाशांमधून मागणी केली जात आहे.
- तसेच पाचोरानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवरूही प्रवाशांसह बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते; परंतु अनेक वर्षांपासून मागणी सुरू करूनही गोवा, कर्नाटक, गीतांजली, दुरंतो, हावडा सुपरफास्ट या गाड्यांना अद्यापही थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या गाड्यांना संबंधित स्टेशनवर थांबा देण्याची मागणी होत आहे.
इन्फो :
थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास
गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या असलेल्या गाड्यांना थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे या ठिकाणाहून दिल्ली-गोवाकडे जायचे म्हटल्यास जळगावला जाऊन गाडी पकडावी लागते. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो. तरी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देणे गरजेचे आहे.
संदीप पाटे, प्रवासी.
जिल्ह्यात भुसावळ व जळगावनंतर चाळीसगाव स्टेशन मोठे आहे. रेल्वेला सध्या सुरू असलेल्या गाड्यांना बऱ्यापैकी उत्पन्नही चाळीसगावहून मिळत आहे; मात्र गोवा एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस आदी महत्त्वाच्या गाड्यांना इतक्या वर्षांत अनेकदा मागणी करूनही थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे.
योगेश पाटील, प्रवासी.