अपक्षांनीही गाठला लाखाचा आकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:14 IST2019-04-17T13:14:13+5:302019-04-17T13:14:41+5:30
प्रमुख पक्षांची रणनीतीही महत्त्वाची

अपक्षांनीही गाठला लाखाचा आकडा
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता अपक्ष उमेदवार हे विजयी आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणारा उमेदवार यांच्यासाठी फारशी डोकेदुखी ठरलेले नाही, असे गत दोन निवडणुकांवरून दिसून येते. मात्र त्यांनी गेल्या निवडणुकीत गाठलेला लाखाचा आकडा याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही भाजपच्या उमेदवार- विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यातच होणार आहे.
२०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात होते. यात १० अपक्ष तसेच आठ इतर पक्षांचे यांच्या मतांची एकूण बेरीज जवळपास एक लाख आठ हजार १६५ होते. गत वेळी सुमारे १० लाखांवर एकूण मतदान झाले होते.
त्यात अपक्ष व इतर आठ अपक्षांची मते एक लाखावर जातात. याची टक्केवारी काढल्यास जवळपास १० टक्क्यांवर जाते. परिणामी अपक्ष या मतदारसंघात विजयी होणारा आणि दुसºया क्रमांकाची मते मिळविणारा उमेदवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारा नसला तरी त्याकडे लक्षच द्यावेच लागणार आहे.
याशिवाय याआधीच्याही २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतही रावेर मतदारसंघात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्या वेळीही अपक्ष डझनभर उमेदवार व इतर पाच पक्ष मिळून जवळपास ९० हजारांचा आकडा पार केला होता. यामुळे या निवडणुकीत अपक्षांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार कोणती नीती अवलंबतात यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.