आता स्थानिक समिती घेणार वर्ग सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST2021-07-09T04:12:03+5:302021-07-09T04:12:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन ...

Now the local committee will take the decision to start the class | आता स्थानिक समिती घेणार वर्ग सुरू करण्याचा निर्णय

आता स्थानिक समिती घेणार वर्ग सुरू करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय बुधवारी शिक्षण विभागाने जारी केला आहे. ज्या गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करायचे आहेत, तिथे किमान महिनाभर आधीपासून एकही कोरोनाबाधित नसावा. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

कोरोनामुक्त क्षेत्रांतील ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोरोना निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे. पालकांशी चर्चा करून याबाबतचा ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत.

नव्याने घेतला निर्णय

दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून बुधवारी पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यावेळी निर्णयात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

चला मुलांनो शाळेत चला...

शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये सहा फुटांचे अंतर, एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे. तसेच चला मुलांनो शाळेत चला ही माेहीम राबविण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

समितीत यांचा समावेश

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सरपंच तर सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच निमंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी, सदस्य सचिव ग्रामसेवक, सदस्य म्हणून मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश असेल.

Web Title: Now the local committee will take the decision to start the class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.