धरणगावच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीसह ९ जुगाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:57+5:302021-07-28T04:16:57+5:30
जळगाव : जुने बसस्थानकाच्या पाठीमागे मनीष कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या ...

धरणगावच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीसह ९ जुगाऱ्यांना पकडले
जळगाव : जुने बसस्थानकाच्या पाठीमागे मनीष कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास धाड टाकली. त्यात धरणगावच्या माजी नगराध्यक्षांचे पती ज्ञानेश्वर महाजन (वय ५३, रा. मोठा माळीवाडा, धरणगाव) यांच्यासह ९ जुगाऱ्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व वाहने मिळून ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुने बसस्थानकाच्या पाठीमागे मनीष कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर ज्ञानेश्वर महाजन यांनी योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धरणगाव या नावाने जुगार अड्डा सुरू केला होता. याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी त्यांच्या कार्यालयातील अशोक फुसे यांच्यासह सहकाऱ्यांना घेऊन मध्यरात्री दीड वाजता या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पहाटे चार वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान, याआधीदेखील याच अड्ड्यावर तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी कारवाई केली होती.
दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे रुस्तम तडवी यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर भादू महाजन (रा.धरणगाव), भूषण रामा माळी (वय २४, रा.धरणगाव), दिनेश दिलीप धोबी (वय २४, रा.मेहरुण), मनोज जयराज जयंतीलाल (वय ६०,रा.नवी पेठ), रोहित संजय पवार (वय २६, रा.गणेश कॉलनी), ज्ञानेश्वर बुधा चौधरी (वय ५६, रा.धरणगाव), गणेश आत्माराम महाजन (वय ३२, रा.धरणगाव), गुलाब लखीचंद सपकाळे (वय ३०, रा.सावखेडा, ता.जळगाव) व लोकेश विनोद झंवर (वय ३२, रा.भोकर, ता.जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ज्ञानेश्वर महाजन यांची चारचाकी जप्त करण्यात आली आहे.