कुत्र्यांच्या हल्यातून आदिवासी तरुणांनी नीलगायीला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:38+5:302021-08-01T04:16:38+5:30
दि. ३१ रोजी संध्याकाळी अचानक एक १८ महिने वयाची नीलगाय सैरावैरा धावत बांभोरी शिवारातून पळत असतानाच गावातील १५ ते ...

कुत्र्यांच्या हल्यातून आदिवासी तरुणांनी नीलगायीला वाचविले
दि. ३१ रोजी संध्याकाळी अचानक एक १८ महिने वयाची नीलगाय सैरावैरा धावत बांभोरी शिवारातून पळत असतानाच गावातील १५ ते २० कुत्रे या निलगायीच्या मागे सुसाट वेगाने सुटले व तिला शेतात आडवी पाडली; परंतु तिच्या सुदैवाने गाव जवळच होते. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे शेतातून कामे आटोपून घरी पोहचत असलेली ही आदिवासी तरुण पोरंदेखील या गायीच्या बचावासाठी शेताकडे धावली. कुत्र्यांवर दगडांचा मारा सुरू केल्यावर ती पळाली; परंतु तोपर्यंत या नीलगायीला कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर जखमी केले होते.
शेतातून या गायीला उचलून संजय सोनवणे, बाळू मोरे, रमेश निकम, जितू मोरे, राजू मोरे यांनी एरंडोल-कासोदा या रस्त्यावर आणून एरंडोलच्या वन विभागाला संपर्क केला. वन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत या तरुणांनी तिच्या जखमांवर हळद लावली. तसेच तिला पाणी पाजले. संध्याकाळी सहा वाजेदरम्यान कर्मचारी तिला एरंडोल येथे घेऊन गेले आहेत.
आमच्या कर्मचाऱ्यांनी ही नीलगाय असून ती १८ महिने वयाची आहे, अशी माहिती कळविली आहे. गावातील तरुणांनी तिच्या जखमांवर हळद लावली, हे महत्त्वाचे काम केले आहे. दोन दिवसांत ती ठणठणीत होईल, तेंव्हा तिला रानात सोडले जाईल, असे वन अधिकारी देसाई यांनी सांगितले.