केळीच्या नव्या लागवडीला रोगाचा धोका, वादळी पावसाचाही तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:42 IST2020-07-06T05:41:10+5:302020-07-06T05:42:04+5:30
रावेर तालुका केळीचे माहेर म्हणून ओळखला जातो. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराधार ठरली असून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वादळी पावसाने तडाखा दिल्याने सुमारे ३५ गावांमधील ९०० हेक्टरवरील कापणीवरील केळीबागा भुईसपाट झाल्या.

केळीच्या नव्या लागवडीला रोगाचा धोका, वादळी पावसाचाही तडाखा
- किरण चौधरी
रावेर (जि. जळगाव) : जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरवरील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
रावेर तालुका केळीचे माहेर म्हणून ओळखला जातो. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराधार ठरली असून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वादळी पावसाने तडाखा दिल्याने सुमारे ३५ गावांमधील ९०० हेक्टरवरील कापणीवरील केळीबागा भुईसपाट झाल्या. त्यात सुमारे ७५ कोटी रुपयांची हानी झाली. हे संकट कमी की काय मृगबहार लागवडीखालील केळीबागांवर कुक्कूंभर मोझॅक व्हायरस केळीबागांच्या बांधावर घोंघावू लागला आहे. विवरे बुद्रूक येथील एका केळीबागेत सात खोडांवर या रोगाचा प्रादुर्भाव यंदा प्रथमच आढळून आला आहे.
रावेर व यावल तालुक्यात अजून वाढता प्रादुर्भाव नसला तरी, केळी बागांमधील व बांधावरील वाढते तण व वेलवर्गीय पिकांमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढून विषाणूचा झपाट्याने प्रसार होत आहे.