लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी महिला आघाडीचे महानगराध्यक्षपद गेल्या सहा ते सात महिन्यांपासून रिक्त आहे. या पदासाठी महिला आघाडीत रस्सीखेच सुरू असली तरी सध्या डोक्याला ताप नको म्हणून सबुरीने ही निवड करण्याचा पावित्रा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे. मात्र, या निवडीवरून महिला आघाडीतील अंतर्गत कलह अधिक उफाळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यात हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.
पुन्हा मुलाखती?
महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा ममता सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. या निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, माहिती न पोहोचल्याने या पदासाठी कुणी अर्जच केला नव्हता, नंतर पुन्हा पंधरा प्रश्नांसह सर्व बायोडाटा मागविण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात निरीक्षक सुवर्णा शिंदे यांनी ऑनलाईन मुलाखतीही घेतल्याची माहिती आहे. मात्र, ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. मात्र आता पुन्हा मुलाखती होणार असल्याचा मॅसेज पसरला आणि महिला पदाधिकाऱ्यांमधून मात्र संतापाचा सूर समोर येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. नेमकी या महत्त्वाच्या पदाची निवड का होत नाही, अशीही विचारणा केली जात आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या दौरा रद्दला निवडीची किनार
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा २३ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यात बहुतांश हळदी कुंकवाचे कार्यक्रम होते. प्रदेशाध्यक्षा येऊन केवळ हळदी कुंकुच करतील का? असा संतप्त सवाल अंतर्गतच उपस्थित करण्यात आला होता. शिवाय महिला आघाडी निवडीबाबत वरिष्ठांपर्यंत तक्रार गेल्यानंतर त्यामुळे वाद टाळण्यासाठी अखेर हा दौरा रद्द करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. महिला आघाडी महानगराध्यक्ष निवडीमागे कुठलाही राजकीय वाद नसल्याचे पक्षातील काही वरिष्ठ सांगत आहे. मात्र, वैयक्तीक वाद विवादांमुळे पक्षश्रेष्ठींनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याचेही सांगितले जात आहे.