Sharad Pawar on BJP-MNS Yuti: भाजप आणि मनसेची युती होईल का? शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:23 IST2022-04-15T16:22:14+5:302022-04-15T16:23:24+5:30
Sharad Pawar on BJP-MNS Yuti: सध्या समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येत असून, ही चिंतनीय बाब असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar on BJP-MNS Yuti: भाजप आणि मनसेची युती होईल का? शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं
जळगाव: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या लागोपाठ झालेल्या दोन सभांनंतर राज्यातील राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर शरद पवार यांनीही राज ठाकरेंवर पलटवार केला. राज ठाकरे यांच्या मुद्द्यांचे समर्थन भाजप करताना पाहायला मिळत असून, आता पुन्हा एकदा भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.
जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जातीयवादी का म्हटले, हे माहित नाही. मात्र, फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचा आनंद घेतोय, असा मिश्किल टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला. तसेच सर्वांना सोबत घेण्याची आमची निती आहे. राज्यात विरोधकांचे स्वप्नभंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला.
मनसे व भाजप यांची युती होईल की नाही?
या पत्रकार परिषदेत भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांविषयी शरद पवार यांना विचारले असता, मनसे व भाजप यांची युती होईल की नाही याबाबत सांगू शकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे हे सध्या हिंदुत्वाकडे वळत आहेत, असेही पवार म्हणाले. राज ठाकरे यांनी दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संदर्भ देत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. यावर बोलताना, जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक आहेत असे कौतुक बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते. जेम्स लेन यांच्या पुस्तकात शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे, असे सांगत सध्या समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे. ही चिंतनीय बाब असल्याचा दावा शरद पवार यांनी केला.
दरम्यान, आताच्या घडीला राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावलेले आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्रात सध्या भारनियमन सुरु आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री संपर्कात आहे. राज्य शासन वीजेच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे, असे शरद पवार म्हणाले.