नटवर्य मधुकर तोरडमल आणि चाळीसगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 16:15 IST2017-07-08T16:15:02+5:302017-07-08T16:15:02+5:30
वयाच्या 84व्या वर्षी 2 जुलै रोजी त्यांचे निधन झाले

नटवर्य मधुकर तोरडमल आणि चाळीसगाव
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 - हुपेडी व्यक्तिमत्त्व, उत्तम शरीरयष्टी, संवादांना न्याय देणारा भारदस्त आवाज.. या अंगभूत गुणवैशिष्टय़ांवर नटवर्य प्रा. मधुकर तोरडमल यांनी नाटय़सृष्टीवर आपले गारुड सदैव झळाळत ठेवले. वयाच्या 84व्या वर्षी 2 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या एकूणच कलंदर व संघर्षमय आयुष्याशी चाळीसगावचे अनेकविधी पदर जोडले गेलेय. त्यांचा जन्मच चाळीसगावचा. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या कुटुंबाचे अहमदनगरला स्थलांतर झाले. तथापि, चाळीसगावचे इनामदार असणा:या तोरडमल यांनी जन्मभूमीचा हात सुटू दिला नाही. त्यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्रात ‘चाळीसगावचा सविस्तर प्रवेश’ रेखाटलाय. अर्थात चाळीसगावच्या सांस्कृतिक वैभवाला मधुकर तोरडमल या नावाने नवी उंचीही मिळाली आहे.
त्यांचे आजोबा स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ब्रिटिश सरकारमध्ये डेप्युटी सुप्रिटेंडेंट होते. नाशिकला 1909 मध्ये कलेक्टर ज्ॉक्सन यांचा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी वध केला, याच प्रकरणात रावबहादूर असणा:या मधुकर तोरमडल यांच्या आजोबांनी मारेक:याला जेरबंद करण्यात यश मिळवले. याची बक्षिसी म्हणून ब्रिटिश शासकांनी ‘सोअर्ड ऑफ ऑर्नर’ हा किताब देऊन त्यांना गौरवितानाच चाळीसगावपासून अवघ्या 20-25 कि.मी.वर असणा:या खराडी या गावी 500 एकर इनामी जमीनही दिली.
खराडी गावाजवळील शिंदी गावातही त्यांच्या मालकीची 50 एकर जमीन होती. पुढे तोरडमल परिवार खराडी गावी स्थायिक झाला.
दरोडेखोरांशी पंगा आणि खराडी सोडले
खराडी गावातील तोरडमल यांच्या शेतात त्या काळात एक दरोडेखोर लपून बसला होता. त्यांच्या वडिलांनी थेट त्याच्याशी पंगा घेत पोलिसांकरवी त्याला गजाआड केले. दरोडेखोराने त्यांना धमकीही दिली. याच धसक्याने त्यांच्या वडिलांनी खराडी गावातून आपले बि:हाड चाळीसगावी हलवले. स्टेशन पलीकडील माणेकजी पारशी यांच्या इमारतीत ते भाडेकरू म्हणून राहू लागले.
पाटस्कर ‘मधुकर’चा वाडय़ात जन्म
नेहरूंच्या मंत्रीमंडळातील हरिभाऊ पाटस्कर यांच्याशी मधुकर तोरडमल यांच्या परिवाराचा स्नेह होता. पाटस्करांचा एक वाडा रिकामा होता. त्याची ख्याती तेव्हा भूतबंगला अशी होती. हाच बंगला त्यांच्या वडिलांनी विकत घेतला. तोरडमल कुटुंबीय पाटस्करांच्या वाडय़ात राहू लागले. 24 जुलै 1932 रोजी याच बंगल्यात मधुकर तोरडमल यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी तीन विवाह केले, मधुकर तोरडमल हे त्यांच्या तिस:या पत्नीचे अपत्ये. त्यांना दोन भाऊ व एक बहीण अशी भावंडं होती.
अन् रात्रीतून चाळीसगावाहून स्थलांतर
इंग्रजी अमलाखालील भारतीयांमध्ये शेकडो जाती, पोटभेद होते. यामुळे समाजात दुही होती. जातीजातीत श्रेष्ठ-कनिष्ठ वादही होते. याचा फटका मधुकर तोरडमल यांनाही सोसावा लागला. या कालखंडात पाटील-देशमुख या दोन मराठा जातीत वाद होते. त्यांच्या आजी पार्वताबाईंच्या निधनानंतर त्यांचे प्रेतदहन कोणत्या स्मशानभूमीत करायचे, यावरून वाद झाले. चाळीसगावातील काही बडय़ा वजनदार व्यक्तींनी तोरडमल कुटुंबाची उपरे म्हणून संभावना केली.
पुढे मात्र काही व्यक्तींनी त्यांच्या वडिलांवर कजर्वसुलीच्या जप्तीचे बालंट आणले. यातून सुटका करण्यासाठी मधुकर तोरडमल हे सात वर्षाचे असताना एका रात्री 15 मार्च 1939 रोजी त्यांच्या वडिलांनी चाळीसगाव सोडले. आपले बि:हाड अहमदनगरला हलविले.
त्यानंतर तब्बल 22 वर्षानी मधुकर तोरडमल हे चाळीसगावी आले होते.
खराडी, शिंदीच्या जमिनीसाठी संघर्ष
इंग्रजी राजवटीत जहागीरदार-इनामदार यांना काही अडचण आल्यास किंवा वारस सज्ञान होईर्पयत त्यांची मालमत्ता ‘कोर्ट ऑफ वॉर्डस्’ म्हणून सरकार सांभाळत असे. इतर लोकांसाठी ‘इस्टेट नाझर’ अशी सोय होती. कजर्बाजारी पणामुळे मधुकर तोरडमल यांच्या वडिलांनी खराडी व शिंदी येथील साडेपाचशे एकर जमीन कोर्ट ऑफ वॉर्डस् म्हणून सरकारकडे जमा केली. 1944मध्ये मधुकर तोरडमल यांनी मुंबई गाठली. त्यांचे जमिनीकडे दुर्लक्ष झाले. 20 जून 1972 रोजी ते खराडी येथे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्णयानुसार कुळांकडून जमीन ताब्यात घेण्यासाठी आले. मात्र, कालांतराने न्यायालयाने शासन निर्णयाला स्थगिती दिली.
शिंदी येथील सखाराम दौंड यांच्याशी त्यांचा जमीन संघर्ष सुरू होता. 1990 र्पयत स्वत: मधुकर तोरडमल यांनी चाळीसगाव न्यायालयाच्या अनेक वा:या केल्या. पुढे 2010 र्पयतही कोर्टात प्रकरण सुरू होते. शेवटी त्यांच्या वकिलानेही जमीन परत मिळवण्याचा नाद सोडून दिला.
जन्मस्थान चाळीसगावच : मधुकर तोरडमल यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्रात चाळीसगावविषयी स्वतंत्र प्रकरण आहे. यात त्यांनी त्यांचा जन्म चाळीसगाव येथेच झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. 1989 मध्ये शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या सरस्वती व्याख्यानमालेसाठी स्व.डॉ.वा.ग.पूर्णपात्रे यांनी, त्यांना निमंत्रित केले होते. 14 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांचे व्याख्यान झालेही. व्याख्यानमालेच्या अभिप्राय वहीत त्यांनी अभिप्राय लिहिताना सुरुवात ‘चाळीसगाव हे माङो जन्मगाव’ या वाक्याने केली असल्याची माहिती ग्रंथपाल अण्णा धुमाळ यांनी दिली.
- जिजाबराव वाघ