पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी नाशिकच्या दाम्पत्याची राज्यभर सायकलवर भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:25 IST2017-12-05T17:17:29+5:302017-12-05T17:25:00+5:30
२३०० किलो मिटरच्या प्रवासा दरम्यान पहूर येथे झाले स्वागत

पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी नाशिकच्या दाम्पत्याची राज्यभर सायकलवर भ्रमंती
आॅनलाईन लोकमत
पहूर,ता.जामनेर,दि.५ : पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी नाशिकच्या देवीदास आहेर व प्रतिभा आहेर या दाम्पत्याने १ डिसेंबर पासून ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत राज्यभर सायकल भ्रमंती सुरु केली आहे. नाशिक पासून सुरु झालेल्या या उपक्रमांतर्गत तब्बल २३०० कि.मी.ची परिक्रमा होणार आहे. मंगळवारी पहूर येथील शाळेत जावून या दाम्पत्याने विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
नाशिक येथील देवीदास आहेर व त्यांची पत्नी प्रतिभा आहेर यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी १ डिसेंबर पासून सायकलद्वारे भ्रमंती सुरु केली आहे. दिवसाला १०० कि.मी.चे अंतर हे दाम्पत्य पूर्ण करीत आहे. २० दिवसात २३०० कि.मी. प्रवास करणार आहेत. यादरम्यान १९ जिल्हे, २३ देवस्थानाना भेटी देणार आहेत. त्यात ५० शाळांमध्ये जाऊन पाच हजार विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या सोबत नितीन धोडपकर आहेत.
पहूरला पर्यावरणावर संदेश
हे दाम्पत्य नाशिक, वणी मार्गे धुळे व तेथून थेट पहूर बसस्थानकावर आले. याठिकाणी ढोलतांशांच्या गजरात सरपंच प्रदीप लोढा, अॅड.एस.आर.पाटील, शैलेश पाटील, ईश्वर बारी, सलीम शे.गनी, विजय पांढरे यांनी स्वागत केले. त्यानंतर महावीर पब्लिक स्कूलमध्ये या दाम्पत्याने विद्यार्थ्यांना, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाºयांना पर्यावरणा विषयी सखोल माहिती दिली.