कत्तलखान्यावर समाजसेवकांच्या मदतीने नशिराबाद पोलिसांची धाड
By सागर दुबे | Updated: March 15, 2023 20:13 IST2023-03-15T20:13:15+5:302023-03-15T20:13:21+5:30
एका तरुणाला अटक ; नशिराबाद पोलिसात गुन्हा

कत्तलखान्यावर समाजसेवकांच्या मदतीने नशिराबाद पोलिसांची धाड
जळगाव : नशिराबाद गावातील स्मशानभूमीजवळ पत्र्यांच्या शेडमध्ये सुरु असलेल्या गुरांच्या कत्तलखान्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास समाजसेवक तसेच ग्रोप्रेमींच्या माध्यमातून नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरीफ खान तसलीम खान (२२ रा. नशीराबाद) यास अटक केली आहे. कारवाईत घटनास्थळावरुन गुरांचे मास, हाडे, शिंगे तसेच कातडीससह गुरांच्या कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
जळगाव शहरातील समाजसेवक राज कोळी यांना नशीराबाद गावात एक तरुण गुरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार राज कोळी यांनी दीपक कोळी, मनोज शिंदे, सागर कापुरे यांना सोबत घेत नशिराबाद पोलिसांना माहिती दिली. नशिराबाद पोलिसांना सोबत घेत बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका घराजवळ सुरु असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. याठिकाणी आरीफ खान तसलीम खान हा मिळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच याठिकाणी गुरांचे मांस, हाडे, शिंगे, कातडी, तीन लोखंडी कुऱ्हाड, ३ मोठे सुरे, ४ लहान सुरे, असा एकूण ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.