नगरपालिका, नगरपंचायतीची प्रभागरचना अडकली कच्च्या आराखड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:32+5:302021-09-08T04:22:32+5:30
अमळनेर : राज्यातील काही जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथे हल्ली प्रभाग रचना ...

नगरपालिका, नगरपंचायतीची प्रभागरचना अडकली कच्च्या आराखड्यात
अमळनेर : राज्यातील काही जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथे हल्ली प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम सुरू आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेले हे काम किती दिवसांत पूर्ण करायचे? तयार करण्यात आलेले कच्चे आराखडे केव्हा आयोगाकडे पाठवायचे? याबाबतचे कोणतेही वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतींची प्रभाग रचना एका अर्थाने कच्च्या आराखड्यातच अडकली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे संकेत देत प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम सुरू करायला सांगितले. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कार्यकाळ संपुष्टात येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.
अमळनेरात तयारी सुरू
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे नेते, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी निवडणुकांची तयारी सुरू आहे. बहुतांश नेत्यांनी रणनितीचे पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. मात्र त्यांची व्यूहरचना तयार असल्याचे दिसून येते. आरक्षणाच्या चक्राकार पद्धतीप्रमाणे यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी राखीव राहणार असल्याचीही चर्चा आहे. या शक्यतेला गृहीत धरूनही काहींचे आराखडे तयार करणे सुरू आहे. अर्थात जोपर्यंत राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देत नाही, तोपर्यंत या सर्व बाबी ‘जर-तर’च्याच चौकटीत अडकल्या आहेत. त्यामुळे तूर्तास तरी राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकाची वाट बघणे सुरू आहे. जनता जनार्दन, नेते आणि इच्छुकांसह नगरपालिका प्रशासनही वेळापत्रकाच्याच प्रतीक्षेत आहे.