कोरोनाविरुद्ध मुक्ताईनगरात मुस्लिम युवकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 16:14 IST2020-04-05T16:11:47+5:302020-04-05T16:14:14+5:30
करणार समाजात जागृती व पोलिसांना सहकार्य

कोरोनाविरुद्ध मुक्ताईनगरात मुस्लिम युवकांचा पुढाकार
मुक्ताईनगर : कोरोनामुळे भारतातसंचारबंदी लागू केलेली असताना निजामुद्दीन येथील तबलीकी जमात प्रकरण घडून त्यात जवळपास साडेसहाशे बाधित मुस्लिम युवक आढळून आल्यानंतर विविध ठिकाणी त्याच्या गंभीर प्रतिक्रिया उमटल्याने मुक्ताईनगर येथील मुस्लीम युवकांनी मात्र पुढाकार घेत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून समाजात जागृती करण्यासोबतच पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका स्वत: पोलीस स्टेशनला येऊन व्यक्त केल्याने हा कौतुकाचा विषय झालेला आहे.
नगरसेवक शकील, मस्तान कुरेशी, शिवसेना जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख अफसर खान, शकूर जमदार, हारुन शेख, शकील मेंबर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खान इस्माइल खान, आरिफ आझाद, मुशीर मन्यार, जाफर अली, लुकमान बेपारी, युनुस मेहबूब, शरीफ मेकॅनिक, जहीर शेख, नूर मोहम्मद व वसीम शेख या प्रमुख मुस्लिम युवक व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांची भेट घेत उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस, आरोग्यप्रशासन झटत असून त्यांना सहकार्य करणे तसेच शासनाच्या निर्देशानुसार मशिदीत गर्दी न करणे, अथवा कोणाकडे बाहेरील कोणी व्यक्ती आल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे आदी विषयावर त्यांनी चर्चा केली.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके , पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळुंके, मुकेश घुगे , अविनाश पाटील उपस्थित होते.