Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:00 IST2025-12-21T15:00:25+5:302025-12-21T15:00:44+5:30
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: भाजपाने रक्षा खडसे यांना फारशी मदत केली नाही. कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळाला नाही. मंत्री पंधरा-वीस मिनिटे जिल्ह्यात येऊन निघून गेले, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदान झाले. या सगळ्याचे निकाल हाती येत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसत आहे, तर काही ठिकाणी गड राखण्यात यश येत आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या मंत्र्यांसह आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, मुक्ताईनगरात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांना धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट विजयी झाला आहे. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीभाजपावर मोठा आरोप केला आहे.
मुक्ताईनगर नगर पंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांना धक्का देण्यात शिवसेना शिंदे गट यशस्वी ठरला आहे. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या उमेदवाराने नगराध्यपदाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा २ हजार ४८६ मतांनी पराभव केला आहे. यावरून आता एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका केली आहे. रक्षा खडसे या भाजपामध्ये एकाकी पडल्या असल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे.
रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या
एकनाथ खडसे म्हणाले की, शेवटचे दोन दिवस निवडणुकीत उतरलो होतो. बाहेरून गुंड शहरात आले. त्याआधीही दहशतीचे वातावरण तिथे होते. रक्षा खडसे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पराभव हा पराभवच असतो तो मान्य केला पाहिजे. या पराभवामागे भाजपाचे अंतर्गत विवादही दिसून आले. भाजपाने रक्षा खडसे यांना फारशी मदत केली नाही. काही प्रमुख कार्यकर्ते रक्षा खडसेंबरोबर होते, पण बाकीचे कार्यकर्ते शिवसेनेबरोबर होते. शिवसेनेच्या मिरवणुकीत भाजपाचे कार्यकर्ते दिसत होते. रक्षा खडसे या भाजपात एकाकी पडल्या. कार्यकर्त्यांची फारशी मदत झाली नाही. मंत्री पंधरा-वीस मिनिटे जिल्ह्यात येऊन निघून गेले. गुंडागर्दीला रक्षा खडसे या एकट्याच सामोरे गेल्या. निवडणुकीत विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केले असते, तर विजय मिळाला असता, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
दरम्यान, मुक्ताईनगरात नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी जळगावसह भुसावळ, बऱ्हाणपुरचे सुमारे २०० तडीपार गुंड आल्याने इतिहासात पहिल्यांदाच या शहराने गुंडगिरी अनुभवली. विशेष म्हणजे हे सर्व स्थानिक आमदाराच्या माध्यमातून घडले, असा मोठा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला.