पहूर येथे महावितरण अधिकाऱ्यांना संतप्त पदाधिकाऱ्यांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:55+5:302021-07-14T04:19:55+5:30
उपविभागीय महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. सोनवणे यांनी कार्यालयात सकाळी प्रवेश करताच संतप्त पेठ व कसबे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ...

पहूर येथे महावितरण अधिकाऱ्यांना संतप्त पदाधिकाऱ्यांचा घेराव
उपविभागीय महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. सोनवणे यांनी कार्यालयात सकाळी प्रवेश करताच संतप्त पेठ व कसबे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चेतन रोकडे, ईश्वर देशमुख यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रश्नाविषयी सरबत्ती सोनवणे यांच्यावर केली. पुरवठा सुरळीत करा, अन्यथा होणाऱ्या परिणामास जबाबदार राहा, अशा इशारा संतप्त पदाधिकारी व नागरिकांनी दिला.
पहूर गाव अतिसंवेदनशील असल्याने अचानक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाकारता येणारा नाही. विजेची समस्या अशीच असेल, तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. नियुक्त लाईनमनला मुख्यालयी थांबण्याचे आदेश द्यावेत, याचबरोबर स्थानिक लाईनमन रितेश भगवान देशमुख यांची पहूर गावात कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पेठ ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. निवेदनावर सरपंच नीता रामेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष संदीप बेढे, भास्कर पांढरे, भारत पाटील, अब्बु तडवी, महेश पांढरे, गणेश पांढरे, नटवर गोयर, रामभाऊ बनकर, अमोल दौंगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
तांत्रिक कारणाखाली
वीजपुरवठा खंडित
वादळ-वारा नसताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. चार ते पाच तास पुरवठा खंडित राहतोय. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. बँका, पतसंस्था, ई महासेवा केंद्र, शासकीय कार्यालय, सर्वसामान्य ग्रामस्थ, तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत. याला मोठा फटका बसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. केवळ देखभाल व दुरुस्ती कामाच्या नावाखाली तांत्रिक कारण पुढे करून वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप संतप्त पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
प्रतिक्रिया...
१३२ के.व्ही. उपकेंद्राजवळ दोन ते तीन विद्युत खांब जीर्ण झाले आहेत. यावरील विद्युत तारा तुटतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. विद्युत खांब लवकरच स्थलांतरित केले जातील व वीजपुरवठा सुरळीत होईल.
- व्ही. डी. सोनवणे
उपकार्यकारी अभियंता, उपविभाग वीज वितरण
कार्यालय पहूर
130721\13jal_1_13072021_12.jpg
पहूर येथे वारंवार विज पुरवठा होत असल्याने विज अधिकाऱ्यांना कसबे व पेठ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेला घेराव.