एमपीएससी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 21:31 IST2021-03-11T21:31:34+5:302021-03-11T21:31:34+5:30
जळगावात विद्यार्थी आक्रमक : तास-दीड तास कोर्ट चौकात रास्तारोको आंदोलन

एमपीएससी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. परिणामी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोर्ट चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहरात वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची...,राज्य सरकारचे करायचे काय, खालती डोके वरती पाय़..., एमपीएससी परीक्षा झालीच पाहीजे...अशा जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर या घोषणांनी दणाणून गेले होते.
रस्त्यावर अचानक सुरू झाले रास्तारोको
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, याची माहिती झाल्यानंतर जळगाव शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी कोर्ट चौकात एकत्र आले. त्यांनी थेट रास्तारोको आंदोलनाला सुरुवात केली. चौकाचे चारही मार्ग विद्यार्थ्यांनी रोखून धरले होते. अचानक सुरू झालेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात, पण एमपीएससी परीक्षा होत नाही...
कोर्ट चौकात रास्तारोको सुरू झाल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांकडून राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे निवडणुका होतात. मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात. त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमतात. त्यावेळी कोरोना फैलावत नाही. फक्त परीक्षा घेतली की कोरोनाचा उद्रेक वाढेल का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.