खासदार उन्मेष पाटील यांची कजगावला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:32+5:302021-09-13T04:15:32+5:30
कजगाव, ता. भडगाव : एकाच आठवड्यात दोनवेळा महापूर आल्याने यात शेताचे, पिकाचे व केटीवेअर सह कजगाव नागद मार्ग व ...

खासदार उन्मेष पाटील यांची कजगावला भेट
कजगाव, ता. भडगाव : एकाच आठवड्यात दोनवेळा महापूर आल्याने यात शेताचे, पिकाचे व केटीवेअर सह कजगाव नागद मार्ग व कजगाव टाकळी मार्ग याचे फार मोठे नुकसान झाले. याबाबत रविवारी खासदार उन्मेष पाटील यांनी कजगाव भेट देत नुकसानीची माहिती जाणून घेतली. जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांशी चर्चा करत काम मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.
दि. ३१ ऑगस्ट व ८ सप्टेंबर रोजी आलेल्या महापुरात कजगाव सह परिसरात ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात हातातोंडाशी आलेले पीक, शेत वाहिली, बागायत विहिरी पुराच्या प्रवाहाने बुजल्या गेल्या. सोबत पाईपलाईन वाहत्या झाल्या. एवढे प्रचंड नुकसान या महापुरात झाले. सोबतच कजगाव नागद मार्गावरील दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले. केटीवेअरच्या दोन्ही बाजूचे भराव वाहते झालेत.
कजगाव टाकळी मार्गावरील फडशी वाहती झाल्याने नदी पलिकडील शेतात शेतकऱ्यांना पोहचणे कठीण झाले आहे. याबाबतीत दि. १२ रोजी खासदार उन्मेष पाटील यांनी कजगाव भेट देऊन महापुरात झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेत महत्त्वाचे असलेला कजगाव-टाकळी मार्ग तत्काळ सुरू करण्याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार पाटील यांनी दिले.
या नुकसानीबाबत तत्काळ नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी जि. प. माजी आरोग्य व शिक्षण सभापती एकनाथ महाजन, दिनेश पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडी भडगाव तालुकाध्यक्ष डॉ. संजय पाटील, छोटुलाल जैन, हरी बोरसे, गरबड बोरसे, विक्रम महाजन, माजी ग्रा. पं. सदस्य अनिल महाजन, सुनील पवार यांच्यासह असंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव चांदवड महामार्गाचे निवेदन
जळगाव चांदवड या महामार्गावरील थांबलेली कामे तत्काळ सुरू करावी. काम थांबल्यामुळे अपघात वाढत आहेत. कजगाव बसस्थानक चौकात गतिरोधक बसवावे, तसेच दुभाजक मधील तुटून पडलेले लाईटचे पोल तत्काळ बसविण्यात यावे, या मागणीचे निवेदन माजी ग्रा. पं. सदस्य अनिल महाजन यांनी खासदार उन्मेष पाटील यांना दिले. या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.