मुलाच्या वाढदिवसालाच आईची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:30 IST2019-11-09T19:28:55+5:302019-11-09T19:30:25+5:30
रात्री मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन असतानाच आशा दिलीपकुमार नाथाणी (५०, रा. गायत्री नगर) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. दरम्यान, आशा यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलाच्या वाढदिवसालाच आईची आत्महत्या
जळगाव : रात्री मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन असतानाच आशा दिलीपकुमार नाथाणी (५०, रा. गायत्री नगर) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. दरम्यान, आशा यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसोली रस्त्यावरील गायत्रीनगरात दिलीपकुमार माणिकमल नाथाणी हे पत्नी आशा व मुलगा विवेक यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. याचठिकाणी वरच्या मजल्यावर आशाबाई यांची बहिण मनिषा इंद्रकुमार नाथाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दिलीपकुमार हे ज्या गावांचा आठवडे बाजार असतो, त्यादिवशी त्या गावांमध्ये कपडे विक्रीचे दुकान लावतात. शनिवारी ते बाहेरगावी होते तर मुलगा विवेक हा कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याने आशा या एकट्याच घरी होत्या. दुपारी तीन वाजता मेहरुण तलावात त्यांचा मृतदेह तरंगत असतांना या परिसरातील गोपाळ कोळी, प्रशांत पाटील यांना दिसून आला. त्यांनी तत्काळ मेहरुण परिसरातील पट्टीचे पोहणारे समाधान नाईक, शरद वंजारी यांना घटनास्थळी बोलावले. मृतदेह पाण्याच्याबाहेर काढून एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, हवालदार सचिन मुंडे यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. डॉ.आकाश चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले.दरम्यान, रविवारी शवविच्छेदन होणार आहे. आशा यांनी आत्महत्या का केली याची माहिती नातेवाईक व पतीही सांगू शकले नाहीत.