जळगाव : जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नसला तरी ऑगस्ट महिन्यापासून चांगला पाऊस होऊ लागल्याने व त्यात सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाचा वेग चांगलाच वाढल्याने आठ तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी पाऊसदेखील १०५.६ टक्क्यांपर्यंत झाला आहे. सर्वाधिक १५८.२ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात झाला असून, त्याखालोखाल पारोळा तालुक्यात १२८.५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, दुसरीकडे चोपडा तालुक्यात अजूनही ७२ टक्केच पाऊस झाला आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून दोन महिने सलग व जोरदार पाऊस नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यांसह पिकांची चिंता वाढली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यात सरासरी पाऊसही वाढत असून, जलसाठ्यातही भर पडत आहे.
चोपड्यात यंदाही चिंता ?
जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस होत असल्याने चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, जामनेर, पाचोरा, रावेर, भडगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. मात्र, चोपडा तालुक्यात अजूनही ७२.८ टक्केच पावसाची नोंद असून, आता पावसाळ्याचा हा शेवटचा महिना असून, या तालुक्यात पावसाची शंभरी होते की नाही, याकडे लक्ष लागले आहे. भूजल सर्वेक्षणातही यंदा चोपडा तालुका वगळता सर्वच तालुक्याच्या जलपातळीत वाढ झाली होती, तर चोपडा तालुक्यात घट झाली होती.
गिरणा धरणसाठा ५५ टक्क्यांवर
गेल्या महिन्यापर्यंत गिरणा धरणातही फारसी वाढ नसल्याने या धरणातही ७ ऑगस्टला केवळ ३९.७० टक्के साठा होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला या धरणात ३३.३१ टक्के जलसाठा होता, त्यात दोन महिन्यांत केवळ ६.३९ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३९.७० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, आता जोरदार पावसामुळे या धरणसाठ्यातही वेगाने वाढ होऊन रविवार, १२ सप्टेंबर रोजी हा साठा ५५.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस
तालुका-पाऊस(टक्क्यांमध्ये)
जळगाव-९४.१
भुसावळ -९५.९
यावल-९४.७
रावेर-१०९.१
मुक्ताईनगर- १०४.७
अमळनेर-९०.६
चोपडा-७२.८
एरंडोल-११२.१
पारोळा-१२८.५
चाळीसगाव-१५८.२
जामनेर-११०.९
पाचोरा-१०७.९
भडगाव-१०१.६
धरणगाव-९१.२
बोदवड-९८.४