'भानगडी थांबवून मिंध्या सरकारने जागे व्हावे; जिल्ह्यात लवकरच उद्धव ठाकरेंची सभा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 17:19 IST2023-03-19T17:13:28+5:302023-03-19T17:19:26+5:30
आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असून त्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.

'भानगडी थांबवून मिंध्या सरकारने जागे व्हावे; जिल्ह्यात लवकरच उद्धव ठाकरेंची सभा'
विजयकुमार सैतवाल
जळगाव : भाजप-शिंदे गटातील भानगडी थांबवून या मिंध्या सरकारने आता तरी जागे व्हावे व शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे पहावे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिंदे सरकारला लगावला. आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असून त्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळात जिल्ह्यात व परिसरात सभा होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीसंदर्भात तयारीच्या दृष्टीने रविवारी ठाकरे गटाच्या ‘शिवगर्जना’ या मेळाव्याचे केमिस्ट भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सावंत बोलत होते. या वेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, समाधान महाजन, दीपकसिंग राजपूत, हर्षल माने, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना प्रमुख पियूष गांधी, नीलेश चौधरी आदी उपस्थित होते.
बावनकुळे यांचे वक्तव्य आणि सरकारला टोला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप २४८ तर शिंदे गट ४० जागा लढवेल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर झालेल्या या मेळाव्यात शिंदे सरकारवर टीका झाली. हे मिंधे सरकार असून आता तरी त्यांनी जागे झाले पाहिजे. तुमच्या आपसातील भानगडी बाजूला ठेवा व अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याकडे पहा, असा सल्लाही सावंत यांनी दिला.
निवडणुकीसाठी तयार रहा
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचाही सूर या वेळी उमटला. पुढील ज्या काही निवडणुका होतील त्यासह विधानसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज रहा व त्या दृष्टीने तयारीला लागा, असे आवाहनदेखील या वेळी करण्यात आले.
पुढील महिन्यात पाचोऱ्यात सभा शक्य
उद्धव ठाकरे यांच्या जिल्ह्यासह परिसरात सभा होणार असल्याने त्याविषयीदेखील या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. या सभांसाठी जोरदार तयारी करायची असून एप्रिल महिन्यात पाचोरा येथे त्यांची सभा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
संजय शिरसाठ यांचा निषेध
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल आमदार संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्याचा या वेळी निषेध करण्यात आला. तसेच बुलडाणा येथील एका पदाधिकाऱ्याने छायाचित्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचाही या वेळी निषेध करण्यात आला.
दोन्ही लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित
संजय सावंत यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदार संघासह रावेर लोकसभा मतदार संघाचेही संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने या मेळाव्याला दोन्ही मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.