डाॅक्टर येत नसल्याने लाखोंचे पशुधन वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:33+5:302021-07-11T04:12:33+5:30
कळमसरे, ता. अमळनेर : येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मध्ये मोडत असून, परिसरातील १७ गावे या दवाखान्याला जोडलेली आहेत; परंतु ...

डाॅक्टर येत नसल्याने लाखोंचे पशुधन वाऱ्यावर
कळमसरे, ता. अमळनेर : येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मध्ये मोडत असून, परिसरातील १७ गावे या दवाखान्याला जोडलेली आहेत; परंतु डाॅक्टरच कामावर येत नसल्याने लाखो किमतीचे पशुधन वाऱ्यावर सोडल्यासारखी दैनावस्था झाली आहे.
कळमसरे गावाचा विस्तार व परिसरातील खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पशुवैद्यकीय दवाखान्याचे वर्ग-१ मध्ये रूपांतर होऊन, पशुवैद्यकीय व सहायक पशुवैद्यकीय असे दोन श्रेणीचे डाॅक्टर गावाला मंजूर आहेत. पैकी भटू संभाजी पाटील यांची एक वर्षापूर्वी सहायक पशुधन विकास अधिकारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाने नेमणूक केली खरी. मात्र, डाॅ. पाटील त्यांच्या सवडीनुसार कधी तरी दवाखान्यात हजेरी लावून जातात. शेतकरी व पशुपालक सकाळपासून आपली जनावरे दवाखान्यात खुट्याला बांधून डाॅक्टर येण्याची प्रतीक्षा करतात; पण डाॅ. भटू पाटील यांचे वेळापत्रक वेगळेच असल्याने अखेर त्रासून शेतकरी शहापूर, भिलाली येथील खाजगी डाॅक्टरांना पाचारण करून महागड्या जनावरांचा जीव वाचविण्यासाठी आर्थिक झळ सोसतात.
३-४ वर्षांपूर्वी विदर्भातले डाॅ. इंगोले पशुधन विकास अधिकारी म्हणून कळमसरे गावाला रुजू झाले होते. त्यांच्यानंतर डाॅक्टरांचे पद रिक्तच होते. ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून तालुक्यातील सर्व आठही पशुवैद्यकीय दवाखान्यांत डाॅक्टर नेमणुकीची जोरदार मागणी लावून धरली होती. डाॅ. थोरात जानवे, डाॅ. भटू संभाजी पाटील, कळमसरे अशा दोनच जागा बदलीने भरण्यात आल्या होत्या. अमळनेर तालुक्यातील रहिवासी असूनदेखील डाॅ. भटू पाटील मुक्या जनावरांच्या शुश्रूषाकामी दुर्लक्ष करीत असल्याची शोकांतिका व्यक्त होत आहे. यासंदर्भात अमळनेर तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. पी. यू. कोरे यांच्याशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही.