भुसावळ : जीवाला जीव लावणारी माणसं गझलेने जोडली गेली. महाराष्ट्रच नव्हे, देशभर मानमरातब मिळाला. दोन ओळींचा शेर रसिकांच्या काळजाला भिडल्यावर जेव्हा त्यांचा हुंदका दाटून येतो आणि तेव्हा जो आनंद मिळतो तो शब्दातीत असतो, अशी भावना यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील गझलकार आबिद मन्सूर शेख यांनी व्यक्त केली.
भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात गुरुवारी ‘अशी बहरली माझी गझल’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जय गणेश स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष चैत्राम पवार हे उपस्थित होते. कबड्डी महर्षी स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष आहे. कविता व गझल विषयाला हे वर्ष समर्पित करण्यात आले, असे समन्वयक गणेश फेगडे यांनी सूत्रसंचालनातून सांगितले. तंत्रसहाय्य बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गिरीश कोळी यांचेही सहकार्य लाभले.
समारोप सत्रात धरणगावचे साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी यांनी मनोगतात या उपक्रमाचे कौतुक केले.
नाटकाची गझल केली, गझलेचे नाटक नाही
‘आग जाती उरी लावूनी चांदण्या, याद येते तुझी पाहुनी चांदण्या’ ही गझल सर्वप्रथम आबिद यांनी सादर करून तरुणाईच्या हृदयाचा ताबा घेतला. त्यानंतर ‘उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय आहे थांबायचे बहाणे’ ही गझल सादर केली. ‘नाटकांची गझल केली, गझलेचे नाटक नाही केले’ असे सांगताना त्यांनी लेखनप्रवास उलगडला.
भुसावळची रसिकता कौतुकास्पद
गझलसम्राट भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या अनेक कार्यक्रमात माझ्या गझला सादर केल्या. त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. वेळोवेळी त्यांनी जे प्रेम दिले ते लिखाणासाठी बळ देणारे ठरले. ऑनलाइन का असेना पण भुसावळची सृजनात्मक रसिकता अनुभवता आली. साहित्यावर प्रेम करणारी माणसं भेटतात तेव्हा हा प्रांत सदाबहार असल्याची प्रचिती येते, असेही गझलकार आबिद शेख म्हणाले.