मेहरुणमध्ये गॅसच्या भडक्याने शिक्षक भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:03+5:302021-09-13T04:17:03+5:30
मेहरुणमधील नशेमन कॉलनीतील शेख शकील शेख अमजद यांचे मेडिकल दुकान असून, ते दोन मुले, पत्नी व सुनांसह वास्तव्याला आहेत. ...

मेहरुणमध्ये गॅसच्या भडक्याने शिक्षक भाजले
मेहरुणमधील नशेमन कॉलनीतील शेख शकील शेख अमजद यांचे मेडिकल दुकान असून, ते दोन मुले, पत्नी व सुनांसह वास्तव्याला आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता शोएल शेख शकील यांच्या पत्नी शार्मीन शेख या कुटुंबासाठी नाश्ता बनवायला किचनमध्ये गेल्या. गॅस सुरू करताच आगीचा भडका झाला. यामुळे घाबरलेल्या शार्मीन या धावतच हॉलमध्ये आल्या. पती शोएल यांनी तातडीने किचनमध्ये धाव घेऊन गॅस सिलिंडर बाजूला करून पाण्याचा मारा केला. त्यात ते भाजले गेले. लोकांनी धाव घेऊन तातडीने आग विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, किचनमधील फर्निचर, फ्रीज, भांडे, लाइट व पाण्याची फिटिंग, खिडक्या, दरवाजा व इतर वस्तू जळून खाक झाल्या. टाइलदेखील खराब झाली. यात साधारण दीड लाखाच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज शेख कुटुंबियांनी वर्तविला आहे.
रात्रीच नवीन सिलिंडर लावले
शेख यांच्या घरातील सिलिंडर शनिवारी रात्री संपले होते, त्यामुळे त्यांनी नवीन सिलिंडर लावले होते. सकाळी ही घटना घडली. सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यामुळेच आग लागल्याचे शेख कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संबंधित गॅस एजन्सी चालकासह त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी नवीन कनेक्शन सुरू करून दिले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.